वाशिम, दि. ३० एप्रिल – जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या दुर्लक्षित कारभाराचा बळी शेतकरी ठरत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील अडाण नदीवर तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट लिकेज असल्यामुळे संपूर्ण सिंचन यंत्रणा फेल ठरली आहे. परिणामी पाण्याअभावी शेकडो हेक्टरवरील पिके कोमेजली असून गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
या निष्काळजी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीनं आज जोरदार भूमिका घेतली. पक्षाचे जिल्हासचिव विनोद भगत यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जि.प. सीईओ यांना निवेदन सादर करून, जिल्ह्यातील सर्व कोल्हापुरी बंधारे व प्लग बंधाऱ्यांची सखोल चौकशी करून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.
८ ऑगस्ट २०१८ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या बंधाऱ्याचे काम २०२२-२३ मध्ये पूर्ण झाले होते. २०२३-२४ मध्ये लोखंडी गेट बसवण्यात आले मात्र ते गळतीमुळे अपयशी ठरले. इतकेच नव्हे तर आजवर या बंधाऱ्यात एक हेक्टरही सिंचन शक्य झालेले नाही, हे वास्तव धक्कादायक आहे.
गेटची लिकेज दुरुस्त झाली तर लाठी व चिखली शिवारातील तब्बल ७९.९९ हेक्टर शेती सिंचित होऊ शकते, तसेच गावातील विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढेल. त्यामुळे हा प्रश्न केवळ सिंचनाचा नसून ग्रामस्थांच्या जीवनमरणाचा आहे.
वंचित बहुजन आघाडीनं हा विषय गंभीर गैरव्यवहार मानत, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असून, पुढील काळात आंदोलनात्मक पावले उचलण्याचाही इशारा दिला आहे.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी न झाल्यास पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांचे नुकसान आणखी गंभीर स्वरूप धारण करणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
0 Comments