Ticker

6/recent/ticker-posts

बनावट नोटांच्या आमिषाने फसवणूक; दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांकडून २.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपी फरार



मानोरा (योगेश देशमुख) – दोन लाख खऱ्या चलनाच्या मोबदल्यात सात लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांविरुद्ध मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोहरादेवी ते कोळवण (ता. आर्णी) दरम्यान नॅशनल हायवे क्र. १६१ अ वर दि. ३१ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिसांनी बनावट नोटा, दरोड्याचे साहित्य, चार मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा एकूण २ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यपाल गोविंद राठोड (वय ३२, रा. माहुली) हे त्यांचा मित्रासह वाहनाने प्रवास करत असताना विठोळीजवळ पोलिस व्हॅन दिसल्याने त्यांनी थांबून माहिती दिली की, जयदेव विजय सोळंके (रा. ज्योतिबा नगर, घाटोडी, ता. पुसद) हा मागील दोन दिवसांपासून त्यांना दोन लाख रुपये खऱ्या नोटांमध्ये घेऊन यावे, त्याबदल्यात सात लाख बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत होता. यासाठी त्यांनी त्यांना पोहरादेवी येथे बोलावले होते.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पोहरादेवी परिसरात सापळा रचला. संशयितांनी नंतर त्यांना दिग्रसजवळ आणि नंतर आर्णी येथे येण्यास सांगितले. पोलिसांनी दोन पंचासह फिर्यादीस घटनास्थळी घेऊन पोहोचले असता, तेथे दोन मोटारसायकलीवर सहा जण आले. त्यांच्याकडे असलेल्या पारदर्शक पिशवीत १४ बंडल बनावट नोटा आढळल्या. त्यापैकी दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

चार आरोपींना घटनास्थळीच अटक करण्यात आली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. संतोष साहेबराव पवार (वय ३८)
  2. साईनाथ नामदेव सोळंके (वय २९)
  3. जयदेव विजय सोळंके (वय ३७) – सर्व रा. ज्योतिनगर, घाटोडी, ता. पुसद
  4. जुनेदखान रियाजखान पठाण (वय २८) – रा. हदगाव, जि. नांदेड

सदर प्रकरणी अज्ञात एक आरोपीसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्लापुरकर, पो.उ.नि. विजय अजमिरे, अभिजित बारे, पोलीस कर्मचारी राहुल जयसिंगकार, मनिष अगलदरे, शेख फिरोज आदींच्या पथकाने केली.

पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून बनावट नोटा प्रकरणातील अधिक तपास गतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments