✍️ – मंगरूळपी
राजस्थानातील सात्विक शांततेचा आणि आध्यात्मिक उर्जेचा केंद्रबिंदू असलेल्या माउंट आबू येथे अलीकडेच एक अलौकिक उपक्रम पार पडला, ज्याने दिव्यांग बांधवांच्या हृदयात आत्मविश्वासाचा आणि सन्मानाचा नवा किरण जागवला. "दिव्यांग समानता, संरक्षण आणि सक्षमीकरण मोहिम" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभियानाचे आयोजन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, मंगरुळपीर यांच्या वतीने करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील मुकबधिर व दिव्यांग निवासी विद्यालय, तुळजापूर तसेच चित्रऋषी महाराज वृद्धाश्रम व दिव्यांग सेवा केंद्र, वरुड – मंगरुळपीर येथून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी या उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवला.
या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना केवळ ‘समाजाचा आधारार्थ’ न मानता त्यांना आत्मनिर्भर, आत्मविश्वासू आणि आत्मज्ञानी बनविण्याच्या दिशेने ब्रह्माकुमारी संस्थेचा स्पष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न दिसून आला.
ब्रह्माकुमारी मुख्यालय, माउंट आबू येथून आलेल्या
🔹 बीके सूर्यप्रकाश भाऊ
🔹 बीके सारिका दीदी
यांच्या स्नेहसंपन्न मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जीवनातील वास्तव स्वीकारण्याची आणि अंतर्मनातील शक्ती ओळखण्याची प्रेरणा मिळाली.
‘ओम शांती परिवार’ आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने राबवले गेलेले विविध ध्यानसत्र, प्रेरणादायी चर्चासत्र, योग व सकारात्मक विचारधारा यावर आधारित मार्गदर्शन यामुळे या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात एका नव्या विचारबीजाचा उगम झाला.
विशेष उल्लेख करावा लागेल तो मुकबधिर व दिव्यांग निवासी विद्यालय, तुळजापूर येथील समर्पित शिक्षक अभिजित राठौड आणि अनिल चव्हाण, बादल भाऊ यांचा, ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या विद्यार्थ्यांना या आध्यात्मिक यात्रेचा लाभ घेता आला. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिबिरात सहभागी करून घेतलं नाही, तर त्यांच्या मनातील भावना, कला व क्षमता प्रकट होईल अशा संधी निर्माण करून दिल्या.
या सर्व कार्यक्रमात सहभागी बालगोपाळांनी गायन, अभिनय, नृत्य, चित्रकला अशा विविध माध्यमांतून आपली प्रतिभा प्रकट केली. त्यांच्या सादरीकरणांनी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणलं आणि मनात अभिमानाचं स्थान मिळवलं.
हा केवळ एक उपक्रम नव्हता – ही होती एक आध्यात्मिक उन्नतीची वाटचाल, जिथे ‘दिव्यांग’ या शब्दामागे लपलेलं ‘दैवीत्व’ खऱ्या अर्थाने प्रकट झालं.
समाज म्हणून आपण केवळ बोलघेवडे स्नेहवचन देत नाही, तर अशा कृतीशील मोहिमांद्वारे प्रत्यक्ष समतेची, सन्मानाची आणि संधींची वाट उघडतो आहोत, हे जाणवून समाधान वाटतं.
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, मंगरुळपीर यांच्या अशा पवित्र कार्याला आमचा मन:पूर्वक शुभेच्छा.
– सुधाकर चौधरी
वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक
0 Comments