बसस्टँड परिसरात बायपास रोडवरील वाहतूक गोंधळामुळे विद्यार्थ्यांची ससेहोलपट
– मंगरूळपीर सुधाकर चौधरी संपादक
मंगरूळपीर शहरातील बसस्टँड परिसर व बायपास रोड हा सध्या विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा बनला आहे. सकाळी शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना रोज जीव मुठीत धरून चालावं लागत आहे. खाजगी वाहने राजरोसपणे रस्त्याच्या कडेला लावली जात आहेत, त्यांच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही. आरटीओ असो की ट्राफिक पोलिस, कुणीच जबाबदारी घेण्यास तयार नाही!
सामाजिक कार्यकर्त्या चंचलताई खिराडे यांनी संतप्त भावना व्यक्त करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जळजळीत शब्दांत सडकून टीका केली आहे –
“विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ होतोय, पण प्रशासन अजूनही झोपेत आहे! डोळे कधी उघडणार?”
पावसामुळे रस्त्याच्या मध्यभागी साचलेलं पाणी आणि चिखलामुळे विद्यार्थ्यांना उभं चालणंही कठीण झालंय. या घाणीतून वाट काढताना अनेकदा मुला-मुलींना अपमानास्पद प्रसंगांना सामोरं जावं लागतं. चंचलताई पुढे म्हणाल्या, “आज माझ्या समोर एका मुलीचा पाय घसरला आणि ती थेट घाणेरड्या पाण्यात पडली. तिचा युनिफॉर्म पूर्णपणे खराब झाला... याला जबाबदार कोण?”
वाहने कुणीही कुठेही उभी करतात. पोलिसांचे लक्षच नाही, त्यामुळे या वाहनधारकांचे मनोबल वाढले आहे. हे लक्षात घेता, जिल्हाधिकारी मॅडम आणि पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालणं गरजेचं आहे.
“या प्रश्नावर माझा कोणताही राजकीय हेतू नाही. पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली पाहिजे!”
अशा ठणकावून मागणी चंचलताईंनी केली आहे.
विद्यार्थ्यांची रोज तारेवरची कसरत – आरटीओ आणि पोलिसांचा मूग गिळलेल मौन !"
0 Comments