Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानोबा-तुकारामांच्या पावलांवर पुण्यतिथी महोत्सवाचा पंढरीप्रवास!"




श्री संत वासुदेव महाराज पुण्यतिथी महोत्सवाची भक्तिपूर्ण सुरुवात!

– अभिष्टचिंतन सोहळ्यात भक्तिरसात न्हालेला वारकरी संप्रदाय


अकोला, दि. ३ जुलै :
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोट यांच्या वतीने आयोजित पुण्यतिथी महोत्सवाची भव्य सुरुवात ३ जुलै रोजी अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात झाली. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून, १० जुलैपर्यंत आकोट व परिसरातील वारकरी भक्तांसाठी हा एक पर्वणीचा काळ ठरणार आहे.

महोत्सवाचा प्रारंभ संस्थेचे अध्यक्ष व मार्गदर्शक ह.भ.प. वासुदेव महल्ले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. नाना महाराज चंदिले (सचिव, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी) होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. सारंगधर महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज चंदिले, समाजसेवक गजानन हरणे, संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव ठाकरे, सहसचिव अवि गावंडे, व निमंत्रित सदस्य गजाननराव दुधाट यांची उपस्थिती लाभली होती.

या सोहळ्यात ह.भ.प. वासुदेव महल्ले व गजानन हरणे यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन औक्षण करत गौरव करण्यात आला. यामुळे संपूर्ण वातावरण श्रद्धेने भारावून गेले.

महोत्सवातील दैनिक कार्यक्रमांमध्ये पहाटे काकडआरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन व भजन यांचा समावेश असून, सकाळ-संध्याकाळच्या सत्रात भाविकांसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याचे आगमन तर उत्सवाचे खरे आकर्षण ठरले. फटाक्यांची आतषबाजी, भाविकांचे जल्लोषात गजर, पावल्यांची लयबद्ध नृत्यरचना आणि "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हा क्षण भक्तिरसात न्हालेला आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाचे अद्वितीय दर्शन घडवणारा ठरला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. अनिल नाराजे यांनी केले, तर संचालन व निवेदनाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे ह.भ.प. अंबादास महाराज मानकर (पालखी व्यवस्थापक) यांनी सांभाळली. शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव अवि गावंडे यांनी करून उपस्थितांचे मनापासून आभार मानले.

संपूर्ण महोत्सव वारकरी परंपरेनुसार शिस्तबद्ध, भक्तिपूर्ण व सौहार्दतेच्या वातावरणात पार पडत असून, हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग या भक्तिपर्वाला अधिकच मंगलमय बनवत आहे.


Post a Comment

0 Comments