"वाद नको, संवाद हवा!"
– माणुसकीची पुकार, नात्यांचा आधार
"आयुष्य खूप छोटं आहे, भांडत नका बसू..."
ही ओळ वाचली की मन अगदी सैरभैर होतं. खरं सांगायचं तर, माणसाच्या हाती वेळ फारच थोडा असतो. कोण कधी, कसं, कुठे आपलं शेवटचं पान लिहून जाईल, हे कुणालाच ठाऊक नाही. म्हणूनच, आपण जिथं आहोत, ज्या लोकांत राहतो, ज्या माणसांतून आपलं आयुष्य चाललेलं आहे — त्यांचं महत्त्व ओळखायला हवं.
आजचं जग बघा — तांत्रिकदृष्ट्या पुढे गेलंय, पण माणुसकीच्या बाबतीत मागे पडलंय. दोन पावलांचं अंतर शंभर मैल वाटतं. संवाद हरवलाय, आणि त्याजागी वाद, अहंकार, गैरसमज, हे सगळं माजलेलं दिसतं. जिथं 'मीच बरोबर' असं म्हणणारे जास्त, तिथं नातं फुलायचं कसं?
"मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंतपणी बोला..."
ही ओळ आपल्याला हलवून टाकते. माणूस जिवंत असेपर्यंत त्याच्याशी बोलावं, त्याचं म्हणणं ऐकावं, त्याला आपुलकीनं भेटावं. माणूस गेल्यावर चार अश्रू गाळण्यात काय अर्थ? जिवंत असताना आपलं माणूसपण दाखवा, एवढीच वेळ हाती आहे.
"नात्याचं नाव नाही, वागणुकीची ओळख हवी"
कधी आई-वडील, कधी सख्खा भाऊ, कधी परका वाटणारा मित्र — नातं नावाने नाही, तर वागणुकीने टिकतं. मनात जर आपुलकी असेल, समजूत असेल, तर परकाही आपलासा वाटतो. आणि मनात राग, ईर्ष्या, मत्सर भरला तर आपल्या माणसाचीही सावली नकोशी वाटते.
"गोड बोलणं हीच खरी सेवा"
दुसऱ्याच्या चुका लगेच लक्षात येतात, पण स्वतःच्या उणीवांकडे पाहण्याचं वेळ कोणाकडे? रोज रुसवे, भांडणं, आरोप-प्रत्यारोप याने नातं कुरतडतं. पण थोडं गोड बोललं, समजून घेतलं, की तुटलेलं नातंही परत फुलू लागतं.
"जिभेवर साखर ठेवा, होणार नाही वाद..."
हा अनुभव प्रत्येक घरात, गावात, मनात घ्यावा लागतो. माणूस मोठा बोलून नाही, तर मोठं मन ठेवून मोठा होतो.
"नात्यांचं हिशोब प्रेमाच्या खणाखणीत नाण्यांतच चालतो"
कोण बरोबर? कोण चूक? याचं हिशोब मांडत बसाल, तर आयुष्यभर रीतं होईल. काही गोष्टी मनाच्या कोपऱ्यात ठेवाव्या लागतात. काही क्षमाच दिल्या पाहिजेत. कारण वादाने नातं संपतं, पण संवादाने टिकून राहतं.
"नातं असावं LICसारखं – जिंदगी के साथ भी, और जिंदगी के बाद भी!"
हे वाक्य आपल्या नात्याचं मूळ सांगतं. जसं एल.आय.सी. संकटाच्या वेळेस आधार देतं, तसं नातंही संकटात साथ देणारं हवं. माणूस नसला, तरी त्याची आठवण, त्याचं प्रेम, त्याच्या शब्दांचा सुगंध — तो शिल्लक राहायला हवा.
शेवटी एवढंच...
राग मनात ठेऊन नका जगू,
मनातला माणूस हरवतो, जेव्हा अहंकार वाढतो.
थोडं गोड बोला, थोडं समजून घ्या,
वाद नको – संवाद करा.
कारण…
"आयुष्य खूप छोटं आहे... भांडत नका बसू!"
✍️ – वाशिम खबर आवाज महाराष्ट्र
संपादक : सुधाकर चौधरी
(ग्रामीण मनाशी संवाद साधणारी लेखणी)
0 Comments