✍️ किशोर देशमुख | मुंबई प्रतिनिधी
“साहेब, खरं सांगाच... आम्ही शाळेत कसं जायचं? आणि दवाखान्यात तरी पोहचायचं कसं?” — हे शब्द आहेत मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावातील विद्यार्थ्यांचे. डोळ्यात प्रश्न, पायात चिखल, आणि स्वप्नात शिक्षण घेऊन चालणाऱ्या या मुलांच्या मुखातून उमटणारा हा प्रश्न केवळ यंत्रणेलाच नव्हे तर माणुसकीलाही हादरवणारा आहे!
२००४ पासून ग्रामपंचायतच नाही!
शेगाव गट ग्रामपंचायतीपासून २००४ मध्ये पांगरी महादेव वेगळी झाली, पण त्यानंतर आजतागायत या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही. ना शाळा, ना रस्ता, ना एसटीचा फेरा! शासनाच्या विकास योजनांचं फक्त पोस्टर गावात दिसतं, पण प्रत्यक्षात विकास म्हणजे ‘शून्य’!
अधिकारी-ठेकेदारांचे निष्क्रिय धोरण
गावकऱ्यांनी कित्येकदा निवेदनं दिली. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, इथपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी पोहोचवली. “तुमचं काम लवकरच होईल” अशी गोड आश्वासनं देऊन सत्ताधाऱ्यांनी वेळ मारून नेली. पण शेवटी ठेकेदारांच्या कुंभकर्णी झोपेने आणि अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे गाव आजही अंधारातच आहे.
गावाच्या दु:खाचं साक्षात दर्शन — जिल्हाधिकाऱ्यांची भेट
या गावातील नागरिकांनी आज आमच्या प्रतिनिधीशी त्यांच्या व्यथा माझ्या कानावर घातल्या.
मी याच भागात राहतो, म्हणून मला त्यांच्या वेदना रक्तात खोलवर उतरल्या.
त्यानंतर किशोर देशमुख यांनी माननीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांच्याशी संपर्क करून या समस्यांचे गांभीर्य सांगितले.
त्यावर त्यांनी हा विषय येणाऱ्या बैठकीत मांडण्याचं आणि मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आहे.
गावात नाही रस्ता, नाही नकाशा, नाही नमुना आठ!
या गावात ग्रामपंचायतच नसल्यामुळे, गावठाणाची हद्द नाही, मालमत्ता नोंद नाही, नमुना आठ नाही.
म्हणजे घरं आहेत, माणसं आहेत, पण शासकीय नोंदीत या गावाचं अस्तित्वच नाही!
गावकऱ्यांच्या घरा-घरांत आजही अनधिकृततेची कुचंबणा आहे
चालता चालता चिखलात फसून अपघात…
गावात रस्ते नाहीत, चिखल आहे. त्यामुळे गेले काही दिवसांत ३ ते ४ नागरिकांचे अपघात झालेत.
चालता चालता लोक खाली कोसळतात. शासनाचं दुर्लक्ष गावकऱ्यांचं रक्त झिरपतंय.
या गावात पाय ठेवला तरी अधिकारी हादरून जातात… कारण इथली परिस्थिती कुठल्याही "पंचांग" सांगणाऱ्यापेक्षा दाहक आणि सत्य आहे!
आजार, पाणीटंचाई, अपघात… जीवन-मरणाची रोजची लढाई
या गावात आजाराचे प्रमाण प्रचंड आहे. वयोवृद्ध, निरक्षर नागरिकांची संख्या अधिक आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई, रस्त्यांची अनुपस्थिती आणि आरोग्य केंद्राचा अभाव यामुळे गावकरी रोजचं जीवन-मरणाचा यज्ञ करत जगतात.
लोकप्रतिनिधी फक्त मतं घेऊन निघून जातात…
पाच वर्षांनी लोकप्रतिनिधी येतात, आश्वासनं देतात… आणि मतं घेऊन भुर्रकन उडून जातात!
शेवटी उरतो तो पांगरी महादेवचा चिखल, अश्रू आणि वेदना!
पांगरी महादेव केवळ एक गाव नाही, ती यंत्रणांच्या अपयशाची जिवंत साक्ष आहे!
लोकशाहीचा उपहास — निवडणुकांना बहिष्कार
गावकऱ्यांनी लोकशाही मार्गाने लढा दिला. निवडणुकांना बहिष्कार, आंदोलने, निवेदनं… पण मिळालं ते फक्त ‘दाद नाही, आश्वासनांची भाऊगर्दी’! एकदाही या गावाच्या पायरीवर मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार – कोणताही लोकप्रतिनिधी ठाम पावलांनी उभा राहिलेला नाही!
विद्यार्थी, महिलांचे हाल
शाळेचा रस्ता नाही, वाहनं नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत. एखादं आजारपण आलं तर गावकऱ्यांना “पोत्यात माणूस टाकून” शेजारच्या गावात न्यावं लागतं. गर्भवती महिलांना वेळेत दवाखाना मिळत नाही, विद्यार्थी चिखलातून चालत दोन-दोन किलोमीटर अंतर पार करतात.
हे फक्त पांगरी महादेवचं दु:ख नाही, तर यंत्रणांच्या ठसठशीत अपयशाचं आणि राजकीय निष्क्रियतेचं ठसठशीत उदाहरण आहे.
काय ही "माझं गाव, माझी जबाबदारी"?
कुठे आहे "सर्वांगीण ग्रामविकास"ची गारंटी?
पांगरी महादेव आजही शासनाच्या रडारवर नाही... आणि जेव्हा गावकऱ्यांच्या जगण्याच्या हक्कालाच शासनाचे डोळे नसतील, तेव्हा लोकशाही खरंच जिवंत आहे का, हा प्रश्न उभा राहतो.
आता तरी जागा व्हा, सत्ताधाऱ्यांनो!
पांगरी महादेवचा आवाज दाबू शकत नाही,
0 Comments