वाशिम –
यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा, सुपखेळा (वाशिम) येथे रक्षाबंधन सण ‘वृक्षबंधना’च्या उपक्रमासह आगळावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मोतीरामजी बापू भवन येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उपप्राचार्य एस.बी. चव्हाण यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत शिक्षक पी.व्ही. पवळ, ए.ए. गवळी, एस.व्ही. वाकुडकर, माजी विद्यार्थी पंकज राठोड, पालक प्रतिनिधी निलेश काकड, सौ. सुरेखा लडके, सौ. सारिका हिप्परकर, सौ. केशव काकड तसेच इको क्लब व राष्ट्रीय हरित सेनेचे पदाधिकारी होते.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करत झाली. बहिण जशी भावाच्या रक्षणासाठी राखी बांधते, तसेच वृक्षांच्याही रक्षणाची जबाबदारी आपली असल्याचा संदेश देण्यात आला. माजी विद्यार्थी पंकज राठोड यांनी रक्षाबंधनाचा इतिहास, शालेय आठवणी आणि विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शालेय संस्कारांवर मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस मेहनत घेऊन कार्यशाळेत हाताने तयार केलेल्या विविध राख्यांचा कार्यक्रमात वापर झाला. अध्यक्षीय भाषणात एस.बी. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे व शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
कार्यक्रमात कार्यशिक्षिका, इको क्लब, राष्ट्रीय हरित सेना सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सिद्धांत डोके व दुर्गेश धाडवे (वर्ग 10) यांनी केले, तर आभार अनिकेत नरवाडे यांनी मानले. ही माहिती प्रसिद्ध विभाग प्रमुख रमेश रावसिंग पडवाल यांनी दिली
0 Comments