कारंजा (प्रतिनिधी) :
गावागावात आणि शहरात भर चौकात, चौफुलीवर, अगदी पोलीस ठाण्याच्या दारात व नगरपालिकेच्या नाकावर टिच्चून मोकाट गुरांचा कळप बसलेला पाहायला मिळतो. कधी गायी-वासरे, तर कधी शेळ्या-बकऱ्या, गाढव-घोडे रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसतात. वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण होतो, तर लहान मुले व शाळकरी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांना घाबरविण्याच्या घटना नेहमीच घडतात. वयोवृद्धांना धडक मारून जखमी करण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढतंय.
पूर्वी नगरपालिकेचे व ग्रामपंचायतींचे कोंडवाडे असल्यामुळे अशा जनावरांचा बंदोबस्त व्हायचा. पकडलेली जनावरे कोंडवाड्यात ठेवली जात व शेतात-बागेत होणारी नासधूस थांबायची. पण आज कोंडवाड्यांचा पत्ता नाही. उलट मोकाट जनावरे भर रस्त्यावर आडवी-तिडवी येऊन बसतात आणि वाहनधारकांच्या डोक्याला ताप देतात. वाहनाने अपघाताने एखाद्या जनावराला धडक लागली, तर मात्र त्याचा मालक हातोहात हजर होऊन दुप्पट-तिप्पट नुकसानभरपाई वसूल करतो, हे वास्तव सर्वश्रुत आहे.
म्हणूनच आता जनतेतून मागणी पुढे येत आहे की, स्थानिक प्रशासनाने तातडीने कोंडवाडे सुरु करावेत आणि पकडलेली जनावरे थेट गोरक्षण संस्थांच्या सुपूर्द करावीत. यामुळे शहरातील व गावातील रस्ते सुरक्षित होतील, शेत-बागांची नासधूस थांबेल आणि अपघातांची शक्यता कमी होईल.
पण प्रश्न असा आहे की — जनतेचे हाल पाहूनही प्रशासन कधी जागे होनार
0 Comments