Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी उत्साहात पार


वाशिम तालुका प्रतिनिधी

सुपखेला गावच्या यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेच्या मैदानावर रविवारी (दि. 10 ऑगस्ट) सकाळपासूनच रंगत आणणारा एक आगळा वेगळा सोहळा उभा राहिला होता. अंगणभर पांढऱ्या शुभ्र पोशाखातील लहानग्या ते तरुण योगपटूंची रांगोळीच जणू उभी राहिली होती. वाशिम जिल्हा यशवंत योगा असोसिएशन, महाराष्ट्र योगा असोसिएशन व योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी उत्साहात पार पडली.


उद्घाटन समारंभाला गावातीलच नव्हे तर जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हरीश बाहेती, योगमार्गदर्शक मा. आत्माराम दहात्रे, जिल्हा हिंदवी परिवार अध्यक्ष मा. दिलीप मेसरे, योगशिक्षक पाचारणे (शिवाजी विद्यालय), अर्चनाताई राऊत, प्राचार्य एम. एस. भोयर, प्राचार्य सी. एम. ठाकरे, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, व्ही. एम. जाधव, रंजीत कथडे, अनिल देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ झाला.

वाशिम जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून 104 स्पर्धकांनी विविध वयोगटांमध्ये सहभाग घेतला. सकस स्पर्धेतून 11 गटांतील पहिले तिघे विजेते ठरले. त्यापैकी 54 निवडक योगपटू बीड येथे 22 ते 24 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेत पंच म्हणून रुस्तुम सरनाईक, हिम्मत वानभरे, तेजस कव्हर, ओम शिंदे, गौरव शेळके यांनी काटेकोर व निष्पक्ष कामगिरी बजावली. आयोजनात जिल्हा यशवंत योगा असोसिएशनचे सचिव आर. ए. सरनाईक, सहसचिव सी. एम. ठाकरे, के. व्ही. बोबडे, कोषाध्यक्ष बी. व्ही. देशमुख, जी. टी. मोरे, बी. डी. सोनटक्के, रामचंद्र ठाकरे, अब्दुल गौरवे यांचे मोलाचे योगदान लाभले.

विशेष म्हणजे, 10 वी ‘ब’ वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून घेतलेली जबाबदारी पाहून उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला. "एकत्र येऊन, योगाची गोडी वाढवणारे हे उपक्रम जिल्ह्याच्या आरोग्य संस्कृतीला नवसंजीवनी देणारे आहेत," असे प्रमुख आयोजक रमेश रावसिंग पडवाळ यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments