प्रत्यक्ष कामकाजाच्या आढाव्यात निर्देश; सर्व यंत्रणा सज्ज – पोलिस अधीक्षक तारे
वाशिम, दि. २५ नोव्हेंबर – आगामी नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध, गांभीर्याने आणि समन्वयाने कार्य करावे, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आलेल्या निवडणूक तयारीच्या प्रत्यक्ष कामकाज आढावा बैठकीत कुंभेजकर बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, तसेच नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त बाबुराव बिक्कड उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
मतदान केंद्रांभोवती १०० मीटरपर्यंत बॅरिकेटिंगचे निर्देश
कुंभेजकर यांनी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात बॅरिकेटिंग करण्याचे आदेश दिले. ऍन्टीसिपेट क्राऊड मॅनेजमेंटच्या अनुषंगाने संवेदनशील ठिकाणांची तात्काळ ओळख करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
एसएसटी, व्हीएसटी आणि एफएसटी पथके तातडीने कार्यान्वित करून संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करावी, असेही ते म्हणाले.
अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना अनिवार्य
मतदान केंद्रांवर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश देताना जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या ग्रामपंचायती व संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष देण्यास सांगितले. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सजग राहून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, तसेच झालेल्या कारवाईचे अहवाल आचारसंहिता कक्षाकडे सादर करावेत, असे त्यांनी नमूद केले.
पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज – पोलिस अधीक्षक तारे
जिपोअ अनुज तारे यांनी जिल्ह्यातील पोलिस पथकांचे रूटीन व्हिजिट सुरू असल्याचे सांगितले. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रॉम्ट अॅक्शन मोडमध्ये कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
— संपादक : सुधाकर चौधरी
0 Comments