Ticker

6/recent/ticker-posts

गणित : इंटरडिसिप्लिनरी इनोव्हेशनची अदृश्य पण अचूक शक्ती


एनआयटी गोव्याचे डॉ. रवी रागोजू यांचे रायसोनी विद्यापीठात प्रेरणादायी व्याख्यान

अमरावती : अनिता यादव 

गणित हे फक्त पाटीवरचे आकडे नसून—ते नवोन्मेष, संशोधन आणि वैज्ञानिक प्रगतीचे धडधडते हृदय आहे. आज कोणतेही इंटरडिसिप्लिनरी संशोधन गणिताशिवाय कल्पनाच करू शकत नाही,” अशा प्रभावी शब्दांत एनआयटी गोवाचे सहप्राध्यापक आणि देशातील ख्यातनाम संशोधक डॉ. रवी रागोजू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जी एच रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे “इंटरडिसिप्लिनरी अभ्यासात गणिताची भूमिका” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात त्यांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. गणितीय मॉडेलिंगपासून ते बिग डेटा, इंजिनिअरिंग डिझाइन, अर्थव्यवस्था, जैवशास्त्र ते सामाजिक शास्त्रांपर्यंत—गणित कसे प्रत्येक क्षेत्राचे ‘बॅकबोन’ बनले आहे, याचे त्यांनी रोचक, समकालीन आणि परिणामकारक दाखले मांडले.

जागतिक स्तरावर येणाऱ्या जटिल समस्या सोडविण्यासाठी गणित हा सर्वात विश्वासार्ह मार्गदर्शक आहे. भविष्यातील शोध, तंत्रज्ञान आणि संशोधनाची दिशा गणित ठरवणार आहे,” असा ठोस दावा डॉ. रागोजूंनी केला.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना कुलपती डॉ. विनायक देशपांडे यांनी आधुनिक शिक्षणातील इंटरडिसिप्लिनरी दृष्टिकोनाचे महत्व अधोरेखित केले. “ज्ञानसीमांची भिंत तोडून नव्या संशोधन संस्कृतीकडे विद्यापीठ वाटचाल करत आहे,” असे ते म्हणाले.

व्याख्यानाचे सुसंचालन पीएच.डी. सेल प्रमुख व ईटीसी विभागप्रमुख डॉ. श्रीकांत चवाटे आणि गणित विभागाचे प्रा. डॉ. प्रकाश नारायण यांनी उत्कृष्टरीत्या केले. विविध संकायांतील सुमारे १०० शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित राहून व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात छात्रकल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट, कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल, परीक्षा नियंत्रक डॉ. विनायक डाकरे, डॉ. महिप बरतेरे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments