Ticker

6/recent/ticker-posts

सेलू बाजाराजवळील नागी येथे चोरट्यांचा धुमाकूळपोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून तीन घरफोड्या; ९.३५ लाखांचा ऐवज लंपास


मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील सेलू बाजारापासून अत्यंत जवळ असलेल्या नागी गावात मध्यरात्री घडलेली चोरीची घटना केवळ एक घरफोडी न राहता, पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरली आहे. गजबजलेल्या बाजारपेठेजवळ, वस्ती असलेल्या परिसरात अज्ञात चोरट्यांनी पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून सलग तीन घरांवर हात साफ करत तब्बल ९ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

२४ डिसेंबरच्या मध्यरात्री नागी (ता. मंगरूळपीर) येथे ही घटना घडली. सेलू बाजार, दळणवळणाची सतत वर्दळ, दुकाने व वस्ती अगदी जवळ असतानाही चोरट्यांनी निर्भयपणे घरे फोडल्याने चोरांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याचेच चित्र दिसून येते.

या घरफोड्यांची सुरुवात मोहन रामदास राउत (वय ४५) यांच्या घरातून झाली. पहाटे साडेतीनच्या सुमारास घरातील महिला उठल्यानंतर चोरी उघडकीस आली. घरातील लोखंडी कपाट व लॉकर फोडून चोरट्यांनी सुमारे ९० ग्रॅम सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये रोख, असा ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

याच परिसरात राहणाऱ्या राजेश अमृतराव राउत (वय ४३) यांच्या घरातूनही चोरट्यांनी ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३ हजार रुपये रोख, असा २ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे, दोन्ही घरांमध्ये चोरट्यांनी कपाटे व लॉकर उघडून मुद्देमालावर डोळा ठेवत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याचे दिसून येते.

इतक्यावरच न थांबता, प्रदीप उर्फ दीपक विठ्ठलराव राउत यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने व ७,५०० रुपये रोख, असा १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री, एकाच परिसरात सलग तीन घरफोड्या होणे हे संपूर्ण परिसरासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

सेलू बाजारासारख्या गजबजलेल्या ठिकाणाच्या अगदी सान्निध्यात चोरी होत असताना, रात्रीची पोलीस गस्त, नाकाबंदी व पेट्रोलिंग कुठे होते? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वीही नागी व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, आरोपी अद्याप मोकाट असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या प्रकारामुळे नागी गावासह सेलू बाजार परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे सांगितले असले तरी, ठोस कारवाई, आरोपींची अटक व चोरीचा मुद्देमाल हस्तगत होईपर्यंत जनतेचा रोष शांत होणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.

आता तरी पोलीस प्रशासनाने सेलू बाजार व नागी परिसरात विशेष गस्त, सीसीटीव्ही तपास, संशयितांवर धडक कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments