Ticker

6/recent/ticker-posts

जीएच रायसोनी विद्यापीठात फ्रेंच भाषेवर दोन आठवड्यांची कार्यशाळा यशस्वी


अमरावती – प्रतिनिधी अनिता यादव

जीएच रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे भाषा क्लबतर्फे आयोजित केलेली दोन आठवड्यांची फ्रेंच भाषा कार्यशाळा उत्साहात पार पडली. ६ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा समारोप कुलपती डॉ. विनायक देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २१) झाला.

या कार्यशाळेत बी.टेकच्या ५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. अवघ्या पंधरवड्यात विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषेतील मूलभूत संभाषण, उच्चार, व्याकरण व आत्मविश्वासपूर्ण संवाद कौशल्य आत्मसात केले. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषेत स्वतःचा परिचय, शाखा, आवडी-निवडी आणि करिअरविषयक उद्दिष्टे प्रभावीपणे मांडून उपस्थितांचे लक्ष वेधले.

कार्यशाळेचे संचालन कम्युनिकेशन ट्रेनर नीलीमा नाथे यांनी केले. तर अश्विनी राठी आणि प्रा. कुनाल बोरकर यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून योगदान दिले. या कार्यशाळेचा उद्देश— मूलभूत संभाषण कौशल्ये विकसित करणे, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक फ्रेंच भाषा विकसित करणे, ऐकणे-बोलणे क्षमतांचा विकास आणि जागतिक रोजगार संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे — असा होता.

समारोपात कुलपती डॉ. देशपांडे म्हणाले, “जागतिक स्पर्धेच्या युगात परदेशी भाषांचे ज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे बळ आहे. भारतीय भाषांसोबत फ्रेंचसारख्या भाषांचे ज्ञान त्यांचा जागतिक प्रवास अधिक सक्षम करेल.”

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डीन स्टुडंट्स वेल्फेअर डॉ. प्रशांत अवचट यांचे मार्गदर्शन लाभले. समारंभास कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल आणि डॉ. श्रीकांत चवाटे उपस्थित होते. सर्व ५० सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शेवटी विद्यार्थिनी पियूषा गावंडे हिने आभार मानले.

ही कार्यशाळा केवळ भाषाशिक्षणापुरती मर्यादित न ठरता विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जाण, जागतिक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी ठरली.

Post a Comment

0 Comments