अहिल्यानगर – प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीस फुस लावून अपहरण केल्याचा तसेच पोक्सो अंतर्गत लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप असलेल्या दोन आरोपींना अहिल्यानगर येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश सौ. अंजू शेंडे यांनी निर्दोष मुक्त केले. या खटल्यात पोलिस तपासातील त्रुटी, पिडितेचे नंतर केलेले जबाब, तसेच आरोपी–पिडितेतील संबंध यांचा न्यायालयाने सविस्तर विचार करून ही निर्णय दिला.
अधिक माहितीनुसार, अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्यात पिडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आकाश उर्फ सचिन अंकुश मिसाळ आणि शरद म्हस्के यांच्याविरुद्ध भादंवि कलम 363, 366 सह 34 तसेच पोक्सो कायदा 2012 चे कलम 11(iv) नुसार गु.र.नं. I-509/2021 असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपानुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण व लैंगिक शोषण केल्याचा दावा करण्यात आला होता.
तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर या खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा न्यायाधीश शेंडे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाने एकूण सात साक्षीदार सादर केले. मात्र, प्रतिपरीक्षेत पिडितेनेच स्वतः आरोपी सचिनला फोन करून बोलावून घेतल्याचे स्पष्ट झाले. तसेच पोलिसांनी दाखल केलेल्या कलमानुसार प्रत्यक्षात कोणताही जबरदस्तीचा प्रकार घडला नसल्याचेही उघड झाले.
तपासातील त्रुटी, गुन्हा दाखल करताना घेतली न गेलेली काळजी, तसेच पिडिता नंतर सज्ञान झाल्यावर पिडिता आणि आरोपी सचिन यांनी स्वेच्छेने विवाह केल्याचे पुरावे न्यायालयात मांडण्यात आले. आरोपींनी पिडितेला ना जबरदस्तीने पळवून नेले, ना कोणतेही लैंगिक शोषण केले, असेही प्रतिपादित करण्यात आले.
सर्व कायदेशीर मुद्दे तपासून, तसेच दोष सिद्धीसाठी आवश्यक पुरावे अभावाने, न्यायालयाने सीआरपीसी कलम 235(1) नुसार दोन्ही आरोपींना सर्वच आरोपांतून निर्दोष मुक्त केले.
या खटल्यात आरोपींचे प्रतिनिधित्व पुरुष हक्क संरक्षण समिती, अहिल्यानगर तर्फे अध्यक्ष ॲड. शिवाजी अण्णा कराळे, ॲड. करुणा रामदास शिंदे, ॲड. सत्यजीत शिवाजी कराळे व ॲड. मोनाली बन्सी कराळे यांनी केले.
0 Comments