Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय रंगभूमीवर अमरावतीचा डंका; श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय प्रथम

पिता–पुत्रीच्या नात्याला रंगमंचावर साज; शिवाजी विज्ञान महाविद्यालय प्रथम

अमरावती : अनिता यादव प्रतिनिधी 


जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित ‘जी.एच. रायसोनी करंडक’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती या संघाने उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवत प्रथम क्रमांक पटकावला.

जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अमरावती संभागातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने ‘ओझोन’ या एकांकिकेद्वारे पिता–पुत्रीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत अत्यंत मार्मिकपणे सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली. सादरीकरणातील भावनात्मक खोली व अभिनयातील सहजता यामुळे परीक्षक व रसिक मंत्रमुग्ध झाले.

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक विद्याभारती महाविद्यालय, अमरावती या संघाने ‘लागिन’ या एकांकिकेसाठी, तर तृतीय क्रमांक प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा येथील संघाने ‘अर्बन’ या नाटकासाठी पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता, रंगकर्मी व अधिवक्ता चंद्रकांत कराले यांच्या हस्ते झाले. ते या स्पर्धेचे मुख्य परीक्षकही होते. यावेळी जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल तसेच विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट प्रमुख उपस्थित होते.

डॉ. मृणाल नाईक, डायरेक्टर – जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या चौथ्या आवृत्तीत सर्व सहभागी संघांनी दमदार सादरीकरण करत स्पर्धेची रंगत वाढवली. युवा कलाकारांनी आपल्या अभिनयकौशल्याचा प्रभावी परिचय देत रंगभूमीवरील आत्मविश्वास अधोरेखित केला.

अधिवक्ता चंद्रकांत कराले यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाने सर्व एकांकिकांचे सखोल मूल्यमापन केले. स्पर्धेचे यशस्वी संयोजन जी.एच. रायसोनी विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी अनिता यादव यांनी केले. करंडक समन्वयक शुभांगी ठाकरे व दीपाली यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी मंचसंचालन वांशी शर्मा यांनी केले.

महाराष्ट्रातील महाविद्यालयीन युवकांमध्ये रंगभूमीची जाण वाढवणारी ‘जी.एच. रायसोनी करंडक’ स्पर्धा ही सांस्कृतिक उत्कृष्टतेचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या या दिमाखदार यशामुळे अमरावतीच्या नाट्य चळवळीला नवे बळ मिळाले आहे.


Post a Comment

0 Comments