मंगरूळपीर :
स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने स्त्रीमुक्ती चळवळ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती तसेच श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन सौ. प्रियाताई चंद्रकांत ठाकरे, संचालिका, श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. शितल निलटकर (बी.एड. कॉलेज) उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अनिल बनसोड (आर.ए. कॉलेज, वाशिम) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. खान यांनी सुमधुर शैलीत करून दिला.
प्रथम सत्रात उद्घाटक सौ. प्रियाताई ठाकरे यांचा प्रा. सुषमा जाजू यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रमुख वक्ते डॉ. अनिल बनसोड यांचा सत्कार प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांच्या हस्ते, तर दुसऱ्या वक्त्या प्रा. शितल निलटकर यांचा सत्कार डॉ. खान यांनी केला.
प्रमुख वक्ते डॉ. अनिल बनसोड यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीमुक्ती चळवळीचा सविस्तर आढावा घेतला. बालविवाह, सती प्रथा, केशवपंथ यांसारख्या सामाजिक प्रथांचा ऐतिहासिक संदर्भ देत स्त्रियांवर झालेल्या अन्यायाचे वास्तव त्यांनी प्रभावी शब्दांत मांडले. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतातील स्त्रीस्थितीचे विश्लेषण करत त्यांनी उपस्थित श्रोत्यांना इतिहासाची जाणीव करून दिली.
दुसऱ्या सत्रात प्रा. शितल निलटकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच महिला व सोशल मीडिया या विषयावर उदाहरणांसह सखोल मार्गदर्शन केले.
उद्घाटक सौ. प्रियाताई ठाकरे यांनी आपल्या भाषणात पूर्वीची व आजची शिक्षणपद्धती, तसेच मुलींना मिळालेले शिक्षणाचे स्वातंत्र्य यावर विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनी “स्त्री शिक्षण व स्त्री सक्षमीकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून साक्षरतेमुळे स्त्रियांना हक्क, अधिकार व कायदेविषयक ज्ञान मिळते,” असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेच्या तृतीय सत्रात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन प्रा. सुषमा जाजू यांनी केले, तर उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. अनुश्री मुळे यांनी केले.
ही कार्यशाळा संस्थेचे सचिव चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. आयोजनासाठी डॉ. पवार, डॉ. भगत, डॉ. इंगळे, डॉ. कडू, प्रा. धनजकर, श्री संतोष ठोकळ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यशाळेची सांगता ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीताने करण्यात आली. या कार्यशाळेचा १७५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
0 Comments