Ticker

6/recent/ticker-posts

शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल; सौ. पूनम फालक यांचा सन्मान


लेवा पाटीदार महासंघाकडून सौ. पूनम विजय फालक यांचा गौरव

हा सन्मान म्हणजे फालक परिवाराचा अभिमान – मोहन फालक

भुसावळ : येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या उपशिक्षिका, आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त तसेच शाहू महाराज मानाचा नारीरत्न पुरस्कार व आंतरराष्ट्रीय संस्थेकडील शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्राप्त सौ. पूनम विजय फालक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत लेवा पाटीदार महासंघातर्फे त्यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा गौरव सोहळा पुणे येथील थोपटे लॉन्स, रहाटणी येथे पार पडला. कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, सभागृह नेते व स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक नामदेवदादा ढाके, लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, डी.जी.पी. डॉ. सुहास वारके, गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा व भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. केतकी उल्हास पाटील, जळगाव लेवा समाज मंडळाचे अध्यक्ष व एलएमसी ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद चौधरी, लेवा पाटीदार महासंघाचे सदस्य विजय फालक, भंगाळे गोल्ड जळगावच्या संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या हस्ते सौ. फालक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी समाजबांधव व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुरस्कारप्राप्तीनंतर सौ. पूनम फालक यांनी मिळविलेल्या पुरस्कारांच्या यशानिमित्त कुर्‍हे पानाचे येथील जयलक्ष्मी अकॅडमीच्या वतीने अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेश आरतीने झाली.

या वेळी बोलताना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक म्हणाले की, “हा पुरस्कार केवळ सन्मान नसून तो फालक परिवाराचा अभिमान आहे. सौ. पूनम फालक यांच्या मेहनतीचे, कार्यतत्परतेचे, चिकाटीचे व आदर्श कार्याचे हे द्योतक आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला असून पुढेही नव्या उंचीवर झेप घ्यावी, अशी अपेक्षा आहे.”

श्री दे. ना. भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांनी आपल्या मनोगतातून स्त्रीने आत्मविश्वासाने व कर्तृत्वावर विश्वास ठेवून काम केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते, असे सांगत सौ. फालक यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चेअरमन महेश फालक यांनीही आपल्या भाषणातून त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमास ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी, ताप्ती पब्लिक स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, फालक परिवारातील सदस्य, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत विजय फालक, गोकुळ फालक, जयराज फालक व माधुरी फालक यांनी केले. सूत्रसंचालन लावण्या फालक यांनी केले, तर आभार जयंत फालक यांनी मानले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.


Post a Comment

0 Comments