Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथील तालुका कृषी अधिकारी निलंबित


शेतकरी मारहाण प्रकरणाची शासनाने घेतली गंभीर दखल

मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांच्या मारहाणीच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेत तालुका कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांना दिनांक 17 जानेवारी रोजी तात्काळ निलंबित केले आहे. सदर घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर व दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शासन आदेशानुसार, दि. 14 जानेवारी रोजी गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार हे ‘मनरेगा’ योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात गेले असता, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत संवाद साधत बुटाने मारहाण केल्याचे व धमकावल्याचे प्राथमिक पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील बातमी व समाजमाध्यमांवरील व्हिडिओचा शासनाने आढावा घेतला.

शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे की, सदर अधिकारीचे वर्तन शासकीय शिस्तीस धरून नसून लोकसेवकाच्या विहित आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडून असे अशोभनीय वर्तन होणे प्रशासकीय दृष्टिकोनातून स्वीकारार्ह नसून, या घटनेमुळे विभागाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे व जनमानसात चुकीचा संदेश गेला आहे.

या पार्श्वभूमीवर आयुक्त (कृषि) यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 च्या नियम 4 (1) (अ) नुसार सचिन भास्कर कांबळे यांना निलंबित करण्याची शिफारस शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने सदर नियमांतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून कांबळे यांना आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ निलंबित केले आहे.

निलंबन कालावधीत सचिन कांबळे यांचे मुख्यालय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम येथे निश्चित करण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच निलंबन आदेश लागू असेपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार त्यांना निर्वाहभत्ता व पूरक भत्ते देय राहतील. निर्वाहभत्ता वाढविणे किंवा कमी करण्याबाबतचा निर्णय आयुक्त (कृषि) यांनी प्रकरणातील गांभीर्य व कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा विचार करून घ्यावा, असेही आदेशात नमूद आहे.

निलंबन कालावधीत सचिन कांबळे यांना कोणतीही खाजगी नोकरी, व्यापार अथवा उद्योगधंदा करण्यास मनाई करण्यात आली असून, नियमभंग झाल्यास निर्वाहभत्त्यास अपात्र ठरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात माजी राज्यमंत्री सुभाष रावजी ठाकरे तसेच सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई मनोज ठाकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याबद्दल शेतकरी व नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments