Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाही वाचवायची असेल तर गवत नव्हे, वटवृक्ष निवडा

सत्तेच्या बाजारात गवत वाढतं, लोकशाहीला वटवृक्ष हवा


चांगले विचार समजायला वेळ लागतो.
ते भाषणातून नाही, घोषणांतून नाही,
तर अनुभवातून, सहवासातून आणि संवादातून उमगत जातात.
एकदा का ते उमगले, की मग आयुष्यभर विसरत नाहीत.

आमच्या वयोगटातील पिढी अनेक अर्थांनी नशीबवान होती.
आजच्या गोंधळलेल्या, अस्थिर राजकीय वातावरणाच्या तुलनेत
आम्ही अधिक मूल्याधिष्ठित सामाजिक आणि राजकीय रचनेत वाढलो.
तेव्हा नेते ओळखले जायचे त्यांच्या कामामुळे,
आज मात्र ओळख बनते ती प्रसिद्धी, प्रचार आणि स्वार्थामुळे.

हीच जाणीव अधिक ठळक झाली
कुबेर धाम वारीच्या निमित्ताने झालेल्या सुमारे १२०० किलोमीटरच्या प्रवासात.
हा प्रवास केवळ अंतराचा नव्हता,
तर विचारांचा, अनुभवांचा आणि समाजभानाचा होता.

या प्रवासात सोबत होते —
मंगरूळपीर येथील प्राध्यापक नंदकिशोर गोरे,
महान येथील उत्कृष्ट व्यापारी भगवान भाऊ गोरे,
राजेश वाघमारे — मेडिकल क्षेत्राचे संचालक व यशस्वी व्यापारी,
अकोला येथील योगेश भाऊ इंगळे — एम.एस.ई.बी. चे शासकीय कॉन्ट्रॅक्टर,
श्रीकांत भाकरे — विद्युत वितरण विभागात कार्यरत अधिकारी,
आणि पियुष चव्हाण — समाज कल्याण विभागात कार्यरत संवेदनशील प्रशासकीय व्यक्तिमत्त्व.

महान पायलट अमोल माहोरे

वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपर्क --- सुधाकर चौधरी

हे सर्व केवळ व्यावसायिक किंवा शासकीय पदांवर असलेले लोक नाहीत,
तर विदर्भाच्या सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक जडणघडणीत
मोलाचं योगदान देणारे वटवृक्षासारखे व्यक्तिमत्त्व
आहेत.

या ६०० किलोमीटरच्या प्रवासात झालेल्या चर्चा
राजकारण, समाजव्यवस्था, प्रशासकीय जबाबदाऱ्या,
व्यापारातील प्रामाणिकपणा
आणि पुढील पिढीसमोरील आव्हानांवर केंद्रित होत्या.
कोठेही आरडाओरडा नव्हता,
तर प्रत्येक चर्चेत अनुभवांची खोली आणि जबाबदारीची जाणीव होती.

आजच्या काळात राजकारणात गवतासारखी माणसं मोठ्या प्रमाणावर उगवतात—
क्षणिक, संधीसाधू आणि वेळेनुसार रंग बदलणारी.
पण या प्रवासात भेटलेली माणसं
वादळ झेलून उभी राहिलेली,
मुळं खोलवर रोवलेली
आणि समाजाला सावली देणारी होती.

या सहवासातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—
लोकशाहीला घोषणा देणारे नेते नाही,
तर जबाबदारी ओळखणारे नेतृत्व लागते.
विश्वासघात बहुतेक वेळा बाहेरून नाही,
तर आतून होतो, हे कटू सत्यही चर्चेतून समोर आलं.

आजचा काळ विश्वासाचा नाही,
तर विवेकाचा आहे.
लोकप्रियतेचा नाही,
तर प्रामाणिकपणाचा आहे.

कुबेर धाम वारीचा हा प्रवास
मला पुन्हा एकदा ठामपणे सांगून गेला—
समाज घडवायचा असेल,
लोकशाही टिकवायची असेल,
तर गवतासारख्या नेत्यांवर समाधान मानून चालणार नाही.
आपल्याला वटवृक्षासारख्या
खंबीर, तत्वनिष्ठ आणि दूरदृष्टी असलेल्या माणसांची संगत जपावीच लागेल.

कारण गवत पुन्हा उगवतं,
पण वटवृक्ष घडायला
पूर्ण आयुष्य लागतं.

✍️ सुधाकर चौधरी 

          संपादक

वाशिम खबर – आवाज महाराष्ट्राचे



Post a Comment

0 Comments