वाशिम | सुधाकर चौधरी
जिल्हा प्रशासन वाशिम व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद अंतर्गत आयोजित करण्यात आलेली बचत गटांची जिल्हास्तरीय प्रदर्शनी व विक्री ‘वऱ्हाडी जत्रा’ शनिवारी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी जत्रा परिसरात अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या वऱ्हाडी जत्रेच्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. अर्पित चौहान (भा.प्र.से.), प्रशासक जिल्हा परिषद वाशिम तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाला श्री. किरण गणेश कोवे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वाशिम हे विनीत म्हणून लाभले.
या प्रदर्शनीत जिल्ह्यातील विविध बचत गटांनी साकारलेले वहऱ्हाडी खाद्यपदार्थ, पारंपरिक मसाले, हातमागावर विणलेले कापड, ग्रामीण कलाकुसर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. ग्रामीण महिलांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या उत्पादनांना मोठा प्रतिसाद मिळाल्याने बचत गटांच्या आर्थिक सबलीकरणाला नवी दिशा मिळाली.
यावेळी मा. आमदार सईताई डहाके यांनी प्रदर्शनीस भेट देत बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी जिल्हा प्रशासन राबवत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
याच कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समारोप सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता पार पडला. या स्पर्धांमधून युवक-युवतींना त्यांच्या क्रीडा कौशल्यासह सांस्कृतिक प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व लोकसहभागातून विकास साधणे, हा जिल्हा प्रशासन वाशिम यांचा हेतू या वऱ्हाडी जत्रेच्या यशस्वी आयोजनातून ठळकपणे अधोरेखित झाला आहे.
0 Comments