Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण क्षेत्रातील कार्याला मानाचा तुरा; पूनम फालक यांना ‘शिक्षा शिरोमणी’ पुरस्काराने गौरव


शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

भुसावळ | प्रतिनिधी


भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या आदर्श शिक्षिका, शाहू महाराज नारी रत्न पुरस्कारप्राप्त, कर्मनिष्ठ व धर्मनिष्ठ व्यक्तिमत्त्व तसेच जयलक्ष्मी अकॅडमीच्या प्रमुख आधारस्तंभ सौ. पूनम विजय फालक यांना वर्ल्ड सेवन वंडर्स – रेडीयन्ट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकित संस्थेच्या वतीने ‘शिक्षा शिरोमणी’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शिक्षण, सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

निरपेक्ष निवड प्रक्रिया; देशभरातून मोजक्यांचीच निवड

ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, नृत्य, कला, संगीत, ज्योतिष आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण भारतातून निवड करते. प्रत्येक क्षेत्रातून फक्त पाच व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित केले जाते. त्यामुळे हा पुरस्कार मिळणे म्हणजे कार्याची खरी पावती असल्याचे मत संस्थेचे संस्थापक, समाजसेवक तसेच स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याचे अभ्यासक डॉ. (अॅड.) क्रांती महाजन यांनी व्यक्त केले. पुरस्कार हे पुढील आयुष्यात अधिक प्रभावी कार्य करण्याची प्रेरणा देतात, असेही त्यांनी नमूद केले.

संघर्षातून यशाकडे; विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची वाटचाल

सौ. पूनम फालक यांनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरे जात विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. शिक्षणासोबतच समाजहिताचे कार्य, कुटुंब व सामाजिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या आजवरच्या सर्वांगीण कार्याची दखल घेत नागपूर येथे झालेल्या २३ व्या संमेलनात त्यांना ‘शिक्षा शिरोमणी’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण

हा पुरस्कार नागपूरचे श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले, तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, भारत सुंदरी साहित्यिक व प्राध्यापिका डॉ. रूपाली वशिष्ठ, संभाजीनगरचे क्रीडा शिक्षक डॉ. पंढरीनाथ रोकडे, रामटेकचे चंद्रपाल चौकसे, हिमाचल प्रदेशचे युधिष्ठिर राणा, मुंबईचे डॉ. दिगंबर तायडे, तसेच डॉ. (अॅड.) क्रांती महाजन व सौ. आशा महाजन यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भारतातील विविध प्रांतांतील व विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार म्हणजे कर्माची फळे – पूनम फालक

पुरस्कार स्वीकारताना सौ. पूनम विजय फालक यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत सांगितले की, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे परमेश्वराची कृपा, वडीलधाऱ्‍या मंडळींचा आशीर्वाद व परिवाराच्या पाठबळामुळेच शक्य झाले. हा पुरस्कार म्हणजे केवळ ट्रॉफी किंवा प्रमाणपत्र नसून समर्पित भावनेने केलेल्या कर्माचे फळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यशाचे श्रेय त्यांनी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, ताप्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच जयलक्ष्मी अकॅडमीचे संचालक व संपूर्ण स्टाफ यांना दिले.


सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

या मानाच्या पुरस्कारामुळे शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व घटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सौ. पूनम फालक यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Post a Comment

0 Comments