शेलू बाजार येथे तलवार जप्त; शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल
वाशिम | प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कारवायांचा धडाका लावला असून, शस्त्र अधिनियमांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध दारू, जुगार, गुटखा तसेच शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिमा राबविण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी (स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम) यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे सोनू उर्फ शेख राजीक शेख मोहम्मद (वय २४, रा. शेलू बाजार, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) याच्या घराची पंचासमक्ष झडती घेण्यात आली असता, घरातून एक लोखंडी तलवार मिळून आली.
सदर तलवार बेकायदेशीररीत्या बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे निवडणूक काळात संभाव्य अनुचित प्रकारांना आळा बसणार असून, समाजकंटकांना कडक संदेश दिला गेला आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे व अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर, पोलीस हवालदार राहुल व्यवहारे, पोलीस अंमलदार राजकुमार यादव, भूषण ठाकरे, अविनाश वाढे, तुषार ठाकरे, शुभम चौधरी तसेच चालक पोलीस अंमलदार सुनील तायडे यांनी सहभाग घेतला.
0 Comments