मंगरूळनाथ | प्रतिनिधी
नाथ सेवा फाउंडेशन, मंगरूळनाथ यांच्या वतीने नाथ नगरीचे ग्रामदैवत श्री संत बिरबलनाथ महाराज जन्मोत्सव कार्तिक पौर्णिमा २०२५ रोजी प्रथमच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमानंतर प्रत्येक पौर्णिमेला सकाळ व संध्याकाळ बिरबलनाथ महाराज संस्थान, मंगरूळनाथ येथे आरती व प्रसादाचा उपक्रम नियमितपणे सुरू करण्यात आला होता. या धार्मिक सेवाकार्याला २०२६ पासून अधिक व्यापक व अखंडित स्वरूप देण्याचा संकल्प नाथसेवा फाउंडेशनच्या सर्व सभासदांनी घेतला आहे.
निवडून आलेले सन्माननीय नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच प्रसाददाते यांच्या सहकार्याने हे सेवाकार्य अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये नगराध्यक्ष श्री अशोकभाऊ म. परळीकर व सौ. किरणताई अशोक परळीकर यांच्यासह नगरसेवक —
१) सौ. लताताई पुरुषोत्तमजी चितलांगे,
२) श्री अनिलभाऊ विठ्ठलरावजी गावंडे,
३) सौ. सपनाताई गणेशजी बजाज,
४) श्री सुधीरभाऊ गजाननजी घोरचड,
५) प्रतिमाताई चंद्रशेखरजी भोजने,
६) श्री विरेंद्रसिंह विठ्ठलसिंहजी ठाकुर,
७) श्री श्रीहरीभाऊ प्रकाशरावजी इंगोले,
८) सौ. रूपालीताई मनोजजी खोडे,
९) श्री राजूभाऊ नंदलालजी जयस्वाल,
१०) श्री गणेश रामचरणजी खोडे,
११) सौ. वैशाली संदीपजी हरिहर,
१२) सौ. आशाबाई महादेवजी पवार
यांच्या हस्ते दर पौर्णिमेला पूजन करण्याचे मानस व्यक्त करण्यात आले आहे.
नाथसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून २०१८ पासून सातत्याने प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत या सेवाकार्यातून श्री संत बिरबलनाथ महाराजांची वाशिम जिल्ह्यातील सहा मंदिरे — मंगरूळनाथ, गिम्भा, साखरडोह, मानोरा, जनूना व जयपूर — यांची माहिती विविध माध्यमांतून भक्तांपर्यंत पोहोचविण्यात आली. यामुळे या सर्व मंदिरांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
नुकतेच शनिवारी सायंकाळी ६.०० वाजता नगराध्यक्ष श्री अशोकभाऊ म. परळीकर व सौ. किरणताई अशोक परळीकर यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यावेळी श्री किशोरभाऊ खोडके यांच्या कडून प्रसादाचे वाटप करण्यात आले. या आरती कार्यक्रमात मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.
यापुढील काळातही नाथ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपाचे विविध उपक्रम समितीच्या वतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नाथ नगरीतील धार्मिक परंपरा अधिक बळकट करत भक्तीभाव जागृत ठेवण्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरत असल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे.
0 Comments