काल्पनिक फोटो
— प्रतिनिधी : किशोर देशमुख
वाशिम : Anuj Tare, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अलीकडे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. Washim Policeच्या या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. यापूर्वीही आयपीएस अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात धाडसत्र राबवून अवैध धंद्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
अलीकडे एलसीबीचे पोलीस अधिकारी राजपूत यांनी जिल्ह्यात तसेच मंगरुळपीर परिसरात धाडी टाकत अनेक अवैध व्यवसायांवर कारवाई केली. विशेषतः शेलू बाजार व मोलेगाव परिसरात सुरू असलेले दारूचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
मात्र दुसरीकडे, ज्या भागात अवैध धंदे सुरू असतात त्या ठिकाणच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार किंवा लहान व्यवसाय करणाऱ्या नागरिकांकडून पोलीसांकडून पैशांची मागणी केल्याचेही आरोप होत आहेत. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांबरोबरच त्यांना पाठीशी घालणाऱ्या किंवा संगनमताने काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शेलू बाजार परिसरात अलीकडे अवैध धंद्यांवर धाड टाकण्यात आली असली तरी अनेक गावांच्या आसपास दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत या अवैध व्यवसायांना नेमके कोणाचे संरक्षण आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आवाहन करत काही संशयित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासाव्यात, अशी मागणी केली आहे. जर तांत्रिक तपासणी केली गेली तर संबंधितांचे अवैध धंदे करणाऱ्यांशी असलेले संपर्क समोर येऊ शकतात, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असून त्यांच्या कामामुळे पोलीस खात्याची प्रतिमा उंचावली आहे. मात्र काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबरोबरच पोलीस यंत्रणेमधील भ्रष्ट प्रवृत्तींवरही कठोर कारवाई झाली, तरच कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल आणि जनतेचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Comments