मानोरा, दि. : येथील मुंगसाजी नगर परिसरात घडलेल्या एका गंभीर मारहाण प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्याने केंद्रीय महिला आयोगाने दखल घेत वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे मानोरा पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मानोरा येथील रहिवासी शारदा अमर निलखण यांना दिनांक १० मार्च रोजी आरोपी जय वाघमारे, सुशील वाघमारे व विजय राऊत यांनी कोणतेही ठोस कारण नसताना मारहाण केली. या घटनेनंतर पीडित महिलेकडून मानोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३५१(५) अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पुढील तपासात दिनांक ३० मार्च रोजी कलम ११५(२), ११८(२) व १०९ अन्वये गुन्ह्यात वाढही करण्यात आली.
मात्र, गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत ढिलाई केल्याचा ठपका मानोरा पोलिसांवर ठेवला जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून समाधानकारक कारवाई होत नसल्याने पीडित महिलेचे पती अमर निलखण यांनी केंद्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यांनी सविस्तर तक्रार दाखल करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय महिला आयोगाने वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली असून, प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या नोटीसमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणात आता वरिष्ठ पातळीवरून लक्ष ठेवले जात आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणात लवकरच ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण घटनेमुळे मानोरा परिसरात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच आरोपींना तात्काळ अटक करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments