वाशीम, सुधाकर चौधरी :
पेट्रोल पंपावर डिझेल भरून बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मालेगाव पोलिसांनी थरारक कारवाईत पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा, एक इनोव्हा कार आणि सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मालेगाव पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
घटना २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अमानी येथील विकास गवळी यांच्या पेट्रोल पंपावर घडली. एपी ०७ एसी ४५५४ क्रमांकाची इनोव्हा कार डिझेल भरण्यासाठी पंपावर आली. चालकाने २ हजार रुपयांचे डिझेल भरून घेतल्यानंतर वाहनातील एका व्यक्तीने कर्मचाऱ्याला २ हजार रुपये दिले. यामध्ये एक हजार रुपयांची जुनी खरी नोट होती; मात्र उर्वरित दोन ५०० रुपयांच्या नोटांवर "भारतीय बच्चो का बँक – चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया" असे छापलेले असल्याचे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले.
सतर्कता दाखवत कर्मचाऱ्याने वाहन थांबवून ठेवले आणि पंप मालक विकास गवळी यांना माहिती दिली. गवळी यांनी तत्काळ मालेगाव पोलिसांशी संपर्क साधत संशयित वाहन तेथेच रोखून धरले.
माहिती मिळताच मालेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचांसमक्ष इनोव्हा कारची झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक घबाड सापडले. वाहनातून ५०० रुपयांच्या तब्बल ४,७०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटांची एकूण किंमत २३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय बनावट नोटांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कारही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी माधव केशव काटेकर (वय ६१, रा. मालेगाव) यांच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १७९ व ३(५) अन्वये सातही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या रॅकेटचे धागेदोरे इतर राज्यांपर्यंत पोहोचले आहेत का, याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार करीत आहेत. बनावट नोटांचा साठा कुठून आणला गेला आणि तो कुठे खपविण्याचा डाव होता, याचा तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदिप अग्रवाल, पोलीस निरीक्षक राजेश खेर्डे, पोउपनि राजेश यलगुलवार तसेच पोलीस कर्मचारी मनिष राठोड, शिवाजी काळे, जयशंकर पाटील, विजेंद्र इंगोले, अमोल पवार, वैभव इरतकर आणि गणेश मेटांगळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा आर्थिक फसवणुकीचा डाव उधळला गेला असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
0 Comments