Ticker

6/recent/ticker-posts

पिंपरी-चिंचवड हादरले! सामाजिक कार्यकर्त्यावर भरदिवसा हल्ला; जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी


पिंपरी, दि. १४ जून २०२६ | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि पथविक्रेता समिती सदस्य माऊली उर्फ किसन रामा भोसले यांच्यावर भरदिवसा झालेल्या कथित हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. स्वयंघोषित कामगार नेते काशिनाथ नखाते आणि त्यांच्या समर्थकांनी जमावबंदी आदेश धाब्यावर बसवत ड क्षेत्रीय कार्यालय परिसरात भोसले यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयात ही घटना घडली. माऊली भोसले यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर मंगला कदम यांच्यातील रस्त्यावरील तीव्र शाब्दिक वादाचा व्हिडिओ त्यांनी प्रसारित केल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला.

तक्रारीनुसार, जमावबंदी आदेश लागू असतानाही ४० ते ५० जणांचा समूह ड क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या नावाखाली आलेल्या या जमावाने पूर्वनियोजित कट रचून भोसले यांची रेकी केली आणि त्यांच्यावर हल्ला चढवला, असा आरोप करण्यात आला आहे.

भोसले यांच्या म्हणण्यानुसार, काशिनाथ नखाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना लक्ष्य करत पारधी समाजाबद्दल अपमानास्पद आणि जातीवाचक वक्तव्ये केली. “तुम्ही गद्दार आहात, चोरी करून पोट भरणारी जात आहे,” अशा शब्दांत शिवीगाळ करण्यात आली. तसेच “आज याला जिवंत सोडायचे नाही,” असे म्हणत जमावाने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अचानक झालेल्या या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण प्रयत्न केला आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर हल्लेखोर मागे हटल्याचे भोसले यांनी सांगितले आहे.

या संपूर्ण घटनेमुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित समाजातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह मारहाण, धमकी, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, माऊली उर्फ किसन भोसले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना अटक करावी, अशी मागणी केली आहे.

शहरात भरदिवसा सामाजिक कार्यकर्त्यावर झालेल्या या कथित हल्ल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, आता पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीप : वरील वृत्तातील आरोप हे तक्रारदाराने पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीवर आधारित आहेत. संबंधित आरोपींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

Post a Comment

0 Comments