Ticker

6/recent/ticker-posts

जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या विधी शाळेत नव्या विद्यार्थ्यांचे ‘आरंभ’मधून उत्साहात स्वागत

एलएल.बी. व बी.ए. एलएल.बी.च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम; शैक्षणिक संधींसह कायदे व्यवसायाच्या मूल्यांची दिली ओळख

अमरावती प्रतिनिधी अनता यादव ,

दि . ८ ऑगस्ट : 
जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावतीच्या विधी शाळेच्या वतीने एलएल.बी. आणि बी.ए. एलएल.बी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आरंभ’ या विशेष इंडक्शन व स्वागत कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. नव्या विद्यार्थ्यांना विद्यापीठीय जीवन, शैक्षणिक संधी, सहशैक्षणिक उपक्रम तसेच कायदे व्यवसायातील मूल्ये व जबाबदाऱ्या यांची ओळख करून देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.


या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ ५ ऑगस्ट रोजी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट, विधी शाळेचे अधिष्ठाता डॉ. नित्यानंद पांडेय तसेच व्यवस्थापन अभ्यास शाळेचे अधिष्ठाता डॉ. राजकुमार झा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने व पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. तृतीय सेमेस्टरच्या विद्यार्थी समन्वयकांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. यानंतर विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. कार्यक्रम समन्वयक डॉ. कोमल खजोने यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. विधी शाळेचे अधिष्ठाता डॉ. नित्यानंद पांडेय यांनी नव्या विद्यार्थ्यांना विधी शाळेतील शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध संधींची माहिती दिली.

यावेळी वरिष्ठ विद्यार्थिनी रुचा ठाकूर आणि विद्यार्थी पार्थ कडू यांनी आपल्या विद्यापीठीय अनुभवांची माहिती देत नव्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शैक्षणिक तसेच सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांनी विद्यापीठ परिसरातील विविध उपक्रम व विद्यार्थी जीवनाबाबत मार्गदर्शन केले. कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल यांनी विद्यापीठातील शिस्त, जबाबदार वर्तन आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणातून संस्थेची प्रतिष्ठा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

‘महाविद्यालयीन जीवन हा नव्या संधींचा प्रवास’

अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी नव्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, ज्ञान आणि दृढनिश्चयाने विद्यापीठीय प्रवासाला सुरुवात करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात हा केवळ नवीन शैक्षणिक टप्पा नसून संधी आणि आव्हानांनी भरलेल्या सुंदर प्रवासाचा प्रारंभ असल्याचे त्यांनी सांगितले.

अडचणींना घाबरून न जाता आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता विकसित करा. ज्ञान मिळविण्यासोबतच व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्या, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. प्रशांत अवचट यांनी विद्यापीठाला ‘ज्ञानाचे मंदिर’ संबोधत विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून मिळणारे ज्ञान, मार्गदर्शन आणि अनुभव यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन उपलब्ध प्रत्येक संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाची सांगता सहाय्यक प्राध्यापक अॅड. क्षितिजा देशमुख यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.

कनिष्ठ-सिनियर विद्यार्थ्यांमध्ये संवादाचे नवे पर्व

‘आरंभ’ हा कार्यक्रम केवळ नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणारा उपक्रम न ठरता त्यांना विधी शाळेची शैक्षणिक संस्कृती, शिस्त, विद्यापीठीय परिसरातील वातावरण, विविध संधी आणि कायदे क्षेत्रातील जबाबदाऱ्यांची ओळख करून देणारे प्रभावी व्यासपीठ ठरला. या कार्यक्रमामुळे नव्या व वरिष्ठ विद्यार्थ्यांमध्ये संवादाचे नवे पर्व सुरू झाले असून, जी. एच. रायसोनी विद्यापीठातील विधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली.



Post a Comment

0 Comments