वाशिम-यवतमाळ प्रतिनिधी
राजकारणात पक्षांतर ही नवी गोष्ट नाही. पण एखादा सामान्य कार्यकर्ता पक्ष सोडतो आणि जनतेच्या विश्वासावर खासदार म्हणून निवडून आलेला लोकप्रतिनिधी पक्ष सोडतो, यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. कारण कार्यकर्ता स्वतःच्या बळावर उभा असतो, तर खासदार हा हजारो कार्यकर्त्यांच्या घामावर, मतदारांच्या विश्वासावर आणि पक्षाच्या विचारसरणीवर उभा असतो.
वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्हाभरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. मात्र ही चर्चा केवळ पक्षबदलाची नसून निष्ठा, विश्वास आणि मतदारांच्या भावनांशी संबंधित असल्यामुळे ती अधिक तीव्र झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत देशमुख यांना मिळालेला विजय हा केवळ एका व्यक्तीचा विजय नव्हता. तो हजारो शिवसैनिकांच्या अथक परिश्रमांचा, उद्धव ठाकरेंवरील विश्वासाचा आणि महाविकास आघाडीच्या मतदारांच्या पाठिंब्याचा विजय होता. गावोगावी फिरणारे कार्यकर्ते, उन्हातान्हात प्रचार करणारे पदाधिकारी, स्वतःच्या खिशातून खर्च करणारे निष्ठावंत सैनिक आणि पक्षाच्या झेंड्यासाठी जीवाचे रान करणारे तरुण यांनी देशमुख यांना संसदेपर्यंत पोहोचवले.
आज त्याच कार्यकर्त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत आहे — "ज्यांना आम्ही खासदार बनवले, त्यांनीच आमचा विश्वास तोडला तर आम्ही कोणाकडे पाहायचे?"
विशेष म्हणजे निवडणूक प्रचारादरम्यान आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांत निष्ठेच्या, विचारांच्या आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याच्या शपथा घेतल्या गेल्या होत्या. आई भवानी जगदंबेच्या नावाने दिलेले शब्द आणि जनतेसमोर केलेल्या घोषणा आज कार्यकर्त्यांना आठवत आहेत. त्यामुळे अनेक शिवसैनिक संतप्त स्वरात विचारत आहेत की, "आई भवानीच्या नावाने घेतलेली शपथ जर सत्तेच्या मोहापुढे टिकत नसेल, तर अशा शपथांचे मूल्य काय उरते?"
राजकीय निरीक्षकांच्या मते, लोकशाहीत प्रत्येकाला आपली राजकीय भूमिका बदलण्याचा अधिकार आहे. मात्र मतदारांनी एका विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केले असेल, तर निवडून आल्यानंतर त्या विश्वासाचा सन्मान राखणे ही नैतिक जबाबदारी असते.
देशमुख यांच्या राजकीय प्रवासात यापूर्वीही अनेक पक्षांतरांची नोंद आहे. विविध पक्षांमध्ये प्रवेश, अपक्ष निवडणुका आणि बदलत्या राजकीय भूमिका यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे केवळ राजकीय घटना म्हणून नव्हे तर सत्तेच्या समीकरणांचा भाग म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे "विचारधारा की सत्ताधारा?" हा प्रश्न आता मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक उघडपणे सांगत आहेत की, त्यांनी व्यक्ती म्हणून नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून मतदान केले होते. त्यामुळे देशमुख यांचा निर्णय हा केवळ पक्षांतर नसून मतदारांच्या जनादेशालाच दिलेले आव्हान असल्याची भावना अनेकांमध्ये आहे.
एक ज्येष्ठ शिवसैनिक भावना व्यक्त करताना म्हणाले, "खासदारकी ही देशमुख साहेबांची वैयक्तिक मालमत्ता नव्हती. ती हजारो कार्यकर्त्यांच्या कष्टांची कमाई होती. आम्ही त्यांना संसदेत पाठवले, पण त्यांनी सत्तेच्या दालनात जाताना आमच्या विश्वासालाच मागे सोडले."
राजकारणात पदे येतात आणि जातात. सत्तेची समीकरणे बदलतात. मित्र बदलतात, पक्ष बदलतात, झेंडे बदलतात. पण मतदारांच्या मनावर उमटलेला विश्वासघाताचा डाग सहज पुसला जात नाही. कारण सामान्य कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. बदल्यात त्याला अपेक्षा असते ती फक्त निष्ठेची.
आज देशमुख यांना सत्तेची नवी वाट सापडली असेल. नवीन राजकीय समीकरणांमध्ये त्यांना स्थानही मिळेल. परंतु ज्या मतदारांनी, ज्या शिवसैनिकांनी आणि ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांच्या मनातील वेदना आणि संताप किती काळ दुर्लक्षित राहील, हा खरा प्रश्न आहे.
कारण लोकशाहीत अंतिम निर्णय कोणत्याही नेत्याचा नसतो, कोणत्याही पक्षाचा नसतो. अंतिम निर्णय जनतेचा असतो. जनता शांत असते, पण विसरत नाही. आणि जेव्हा वेळ येते, तेव्हा ती मतपेटीतूनच उत्तर देते.
आज वाशिम-यवतमाळच्या राजकारणात घुमणारा एकच प्रश्न आहे — "खासदारानेच विश्वासघात केला तर सामान्य कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहायचे?"
0 Comments