Ticker

6/recent/ticker-posts

श्री स्वामी समर्थ सेवा दरबार, पाटगाव-देवरूख येथे विद्यार्थ्यांना प्रसादरूपी वह्यांचे वाटप


१०४ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण; आणखी ३४ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार

देवरूख, प्रतिनिधी :

संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव-देवरूख येथील श्री स्वामी समर्थ सेवा दरबारात श्री स्वामी समर्थ भक्तांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना प्रसादरूपी वह्यांचे वाटप करण्यात येत असून, या उपक्रमाला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १०४ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले असून, आणखी ३४ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्यात येणार आहे.

इयत्ता पहिलीपासून ते पदवीधर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रसादरूपी वह्यांचे वितरण करण्यात येत आहे. हा स्तुत्य उपक्रम श्री स्वामी समर्थ सेवेकरी रामदास बाळू शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांपासून अखंडपणे राबविण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना रामदास शिंदे महाराज यांनी सांगितले की, ज्या स्वामी भक्तांना प्रसादरूपी वह्या वाटप सेवेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा दरबार, पाटगाव येथे येऊन या सेवाकार्यात सहभागी व्हावे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच खरी स्वामी सेवा असल्याची भावना यामागे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वह्या वाटप उपक्रमासाठी हातीव पंचायत समिती गणाचे सदस्य मंगेश बांडागळे, प्रकाश भुवड, देवरूख येथील बांधकाम व्यावसायिक संतोष केदारी, मंगेश जठार (मुंबई), दीपक पवार (इचलकरंजी), प्रकाश कांबळे (मुंबई), किसन पवार, कोळी मॅडम, सतीश यादव, संजय कदम, रिद्धी बामणे, श्री. सुर्वे, बाबू रेवणे, प्रियांका सावंत, अनिल तावडे, विकास सावंत, प्रथमेश धामस्कर तसेच अनेक निनावी स्वामी भक्तांनी उदार हस्ते वह्यांचे योगदान दिले आहे.

दरबारात वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. दर गुरुवारी स्वामी भक्तांच्या सहकार्याने महाप्रसाद सेवा अविरत सुरू असते. तसेच दररोज काकड आरती, सायंआरती, शेजारती आणि सुस्वर भजनाचे आयोजन करण्यात येते.

विशेष बाब म्हणजे आजच्या मोबाईल आणि डिजिटल युगातही १ ते १५ वयोगटातील लहान मुले मोठ्या भक्तिभावाने दरबारातील भजन सेवेत सहभागी होत असून, धार्मिक संस्कार जोपासण्याचे कार्य येथे सातत्याने सुरू आहे. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जात असल्याने हा दरबार परिसरातील भक्तांसाठी श्रद्धा, सेवा आणि संस्कारांचे केंद्र बनला आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून मदतीचा हात देत समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे.

Post a Comment

0 Comments