मंगरुळपीर, दि. १५ ऑगस्ट २०२६ : यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुभाषराव ठाकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताने वातावरण देशभक्तिमय झाले. स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये तसेच देशाच्या प्रगतीमध्ये युवकांची भूमिका याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सुभाषराव ठाकरे म्हणाले की, मंगरुळपीर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने शिक्षण प्रसारासाठी संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या, हेच आपल्या कार्याचे खरे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज व्यक्त केली. संगणक व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वाय.सी.सी. बीएससी स्कूलच्या कु. नेहा जटाळे व वेदांत गोदुवाले तसेच वाय.सी. इंग्लिश हायस्कूलच्या कु. उन्नती जाधव व कु. आराध्य चव्हाण यांनी आपल्या सादरीकरणातून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला त्याग आणि देशाच्या विकासाचा वारसा पुढे नेत प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास रमेश नावंदर, नारायणराव बारड, राजकुमार गावंडे, राजू पाटील, प्रकाश महल्ले, डॉ. नवल असावा, चंद्रकांत पाकधने, किशोर पाटील कदम, लईक अहमद, नरेश भगत, अमोल पाटील, यशवंत धोटे, गिरीश बाहेती, विजय भोजने यांच्यासह संकुलातील विविध शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनंत शिंदे व प्रा. डॉ. श्रीकांत रासेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सांगता झाली.
0 Comments