वाशिम | सुधाकर चौधरी | वाशिम खबर आवाज महाराष्ट्र
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली आहे. “माझ्या राजकीय जीवनाची दिशा ही प्रसिद्धी नव्हे, तर शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची आहे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
प्रश्न मोठा की राजकारण?
यवतमाळ–वाशिम मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आपण सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत असल्याचे खासदार देशमुख यांनी सांगितले. विशेषतः पीकविमा प्रश्नासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले, अशी माहिती त्यांनी दिली.
“शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करताना मला प्रसिद्धीची अपेक्षा नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेला पाठपुरावाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे,” असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
मतभेद असू द्या; पण संघर्षाची भाषा नको!
राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, रस्ता अडवणे, खालच्या भाषेत बोलणे किंवा वैयक्तिक पातळीवर टीका करणे यामुळे सर्वसामान्यांचा प्रश्न सुटत नाही, असे सांगत त्यांनी राजकीय विरोधकांनाही संयम आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा तो प्रश्न शासनाच्या दारात घेऊन जाणे आणि त्याच्या निकालासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“शेतकरी माझी प्राथमिकता; संघर्ष थांबणार नाही!”
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी भविष्यातही आपला लढा सुरूच राहणार असल्याचे खासदार देशमुख यांनी ठामपणे सांगितले.
“प्रश्न कोणाचाही असो, त्याच्या सोडवणुकीसाठी संवाद आणि पाठपुरावा हाच मार्ग आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा संघर्ष कायम सुरू राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
वाशिम खबर आवाज महाराष्ट्र
“जे लपवलं जातं... तेच आम्ही दाखवतो!”
0 Comments