लातूर : स्वउत्पन्नातून ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने नोव्हेंबरपासून विशेष करवसुली दिन राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ७८५ पैकी ६४ ग्रामपंचायतींनी २ हजार रुपयांपेक्षा कमी वसुली केल्याने संबंधित ग्रामसेवकांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामसेवकांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर सोमवारपासून सुनावणी होणार आहे.
आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने विशेष करवसुली दिन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कर्मचारी घरोघरी जाऊन पाणीपट्टी, घरपट्टी वसूल करीत आहेत. या कर वसुलीच्या रकमेतून गावात मूलभूत सुविधा पुरविण्यात येऊन विकास साधण्यात येणार आहे. त्यामुळे गावची प्रगती होण्यास मदत होणार आहे.
नोव्हेंबरमध्ये राबविण्यात आलेल्या एका दिवसाच्या मोहिमेत ७६ लाख ५६ हजार ९०९ रुपये ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा झाले होते. तसेच २४ डिसेंबर रोजीच्या मोहिमेत १ कोटी ४५ लाख ९८ हजार ६०३ रुपये वसूल झाले आहेत. या मोहिमेमुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. मात्र, जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे २ हजार रुपयांपेक्षा कमी २ वसुली केलेल्या 64 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना पंचायत विभागाने नोटिस बजावल्या आहेत.
0 Comments