Ticker

6/recent/ticker-posts

मन्नासिंह चौकात वृध्द महिलेच्या गळ्यातुन सोन्याचे दागिने हिसकावलेचोरीची घटना सिसीटीव्हीत कैद : नागरीक भयभित


वाशिम - दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी पाळत ठेवून एकट्या चाललेल्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातुन सोन्याची चैन व मंगळसुत्र हिसकावुन पोबारा केल्याची घटना शहरातील शुक्रवारपेठ भागातील मन्नासिंह चौक येथे शुक्रवार, ५ ऑगष्ट रोजी दुपारी अंदाजे ३ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटना नजीक राहत असलेल्या आशिष ठाकुर यांच्या घरासमोरील सिसीटीव्हीत कैद झाली असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील महिला भयभित झाल्या आहेत.
    याप्रकरणी सिसीटीव्हीत चोरटे स्पष्ट दिसत असून चोरट्यांनी तोंडावर मास्क घातला नव्हता. तसेच त्यांच्याजवळ पल्सर गाडी असल्याचे कॅमेर्‍यात दिसत आहे. याप्रकरणी नागरीकांनी माहिती दिली की, हे दोन चोरटे विना क्रमांकाच्या पल्सर गाडीवर शहरातील विविध भागात फिरुन एकट्या दुकट्या महिलांवर पाळत ठेवत असल्याचे दिसते. तसेच काही दिवसापुर्वी शिवाजीनगरातही या चोरट्यांना नागरीकांना पाहील्याची माहिती समाजमाध्यमांवर नागरीकांनी दिली. शांतताप्रिय परिसर असलेल्या मन्नासिंह चौकात दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे महिला भयभित झाल्या असून महिलांनी अंगावर दागिने असल्यास सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच अनोळखी असलेले व्यक्ती किंवा वाहनधारक परिसरात संशयास्पद स्थितीत फिरतांना दिसत असल्यास नागरीकांनीही त्यांची विचारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकूणच शहरात घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारी टोळी सक्रीय झाली असावी असा कयास आहे. पोलीस विभागाने या प्रकरणाचा तपास करुन चोरट्यांना जेरबंद करावे व महिलांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments