वाशिम : घराची नोंद करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मांडवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने १४ सप्टेंबर रोजी रिसोड येथे रंगेहाथ पकडले. प्रेमानंद शामराव मनवर असे आरोपी ग्रामसेवकाचे नाव आहे.
अन्य दोन जणांची चौकशी ?
मनवर यांच्यावर ट्रॅप होताच त्यांच्या सोबत अन्य दोन ग्रामसेवक उपस्थित होते. त्यांना सुध्दा एसीबीच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा रिसोड शहरात रंगली होती. ट्रॅप झाल्यानंतर सायंकाळपर्यंत या दोघांची चौकशी सुरु असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते..
मांडवा येथील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या घराची नोंद तक्रारदाराच्या नावावर करावयाची होती. यासाठी ग्रामसेवक प्रेमानंद मनवर यांच्याशी संपर्क साधला असता, नोंद करून देण्यासाठी ६ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये स्वीकारले.
दुसऱ्या टप्प्यात पाच हजार रुपये द्यावयाचे होते. बुधवारी (दि. १४) रिसोड
येथे सापळा रचला असून, आरोपीने तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, लाच रक्कम जप्त करण्यात आली. रिसोड पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके व चमूने पार पाडली.
0 Comments