वाशिम : ( दि. 26 जून ) आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम आरक्षण लागू करून वंचित शोषित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासह त्यांच्या शिक्षणासाठी विविध उपाययोजना राबविणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. आजच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शाहू राजांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाच धुळीचा मिळविली आहे.
त्यामुळे देशाला लोककल्याणकारी बनविण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा लोककल्याणकारी विचार आज घडीला अमलात आणण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड यांनी केले.
स्थानिक अकोला नाका येथील नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे दि. 26 जून रोजी समनक जनता पार्टीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती कार्यक्रमाचे तसेच पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. कालापाड बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समनक जनता पार्टीचे वरिष्ठ नेते प्रा. डॉ. अनिल राठोड हे होते. यावेळी विचारपीठावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी. एस. खंदारे, समनक जनता पार्टीचे विभागीय महासचिव प्रा. अनिल बळी, वाशीम जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, वंदना दशरथ राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. कालापाड यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच बहुजनांसाठी आरक्षण लागू केले. म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात. त्यांनी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेऊन समस्त बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणले. गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्या दिल्या. दलित पिचलेल्यांना हक्क अधिकार मिळवून दिले. असे असतांना अलीकडील काळात लोकशाही प्रणालीत सत्तेत आलेल्यांनी हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करून लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाच धुळीस मिळविली आहे. समनक जनता पार्टीच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या लोककल्याणकारी योजना डोळ्यासमोर ठेवून सत्ता ताब्यात घेऊन राज्यकारभार करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समनक जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून प्रा. डॉ. अनिल राठोड यांनी समनक जनता पार्टीच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट करून ओबीसी, भटक्या विमुक्त, धार्मिक अल्पसंख्यांक तसेच इतर वंचित घटकांना सत्तेत बसवून खऱ्या अर्थाने लोकशाही राज्य घडविणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी प्रा. अनिल बळी, पी एस खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र देऊन निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये समनक जनता पार्टीच्या जिल्हा महासचिव पदी मेडशी येथील सुधाकर बबन राठोड यांची निवड करण्यात आली. जिल्हा संघटक पदी कोंडाळा झामरे येथील संजय सिताराम वाणी, जिल्हा उपाध्यक्षपदी मंगरूळपीर येथील संतोष उर्फ बाळासाहेब दिनकरराव काळे, आसेगाव पेन येथील गजानन खानझोडे, कारंजा लाड येथील पुंडलिक लसनकुटे, वाशिम येथील भागवत राजगुरू आदींची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्षपदी सवड येथील माजी सैनिक संजय नवघरे तसेच जिल्हा प्रचार प्रमुख पदी भट उमरा येथील केशवराज वामनराव काळे, कार्यालयीन सचिव पदी दत्तराव वानखडे, जिल्हा सचिव पदी वाशीम येथील आत्माराम सुतार, मंगरूळपीर शहराध्यक्षपदी विजय सखाराम राठोड, वाशिम तालुका उपाध्यक्षपदी समाधान सावंत आदी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पक्षप्रवेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन यशवंत पवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. माणिक राठोड यांनी केले. यावेळी पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments