दि.०४ फेब्रुवारी, २०२४ ते १० फेब्रुवारी, २०२४ दरम्यान नाशिक येथे पार पडलेल्या ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये ०२ सुवर्ण व ०२ रौप्य पदकांची कमाई केली आहे.
नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर ०७ दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये राज्य पोलीस दलातील जवळपास ३५०० स्पर्धक खेळाडू पोलीस अधिकारी व अंमलदारांनी २० प्रकारच्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ मध्ये अमरावती परिक्षेत्राच्या संघाने वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये दमदार कामगिरी करत ०६ सुवर्ण पदके, १६ कांस्य पदके व १४ रजत पदक प्राप्त करत एकूण ३६ पेक्षा जास्त पदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार जगदीश घरडे यांनी ७० किलो वजन गटामध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले त्याचबरोबर महिला पोलीस अंमलदार संगीता मारोती ढोले यांनी ‘पॉवर लिफ्टिंग’ या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक व महिला पोलीस अंमलदार निलोफर शेख यांनी ‘पॉवर लिफ्टिंग’ व ‘वेट लिफ्टिंग’ या दोन क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावत जिल्हा पोलीस दलाच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याचबरोबर सांघिक खेळामध्ये अमरावती परिक्षेत्राच्या बास्केटबॉल संघाने कांस्य पदक पटकावले आहे.
दि.१० फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण करत ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा थाटात समारोप करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मा.पोलीस महासंचालक, श्रीमती रश्मी शुक्ला (भा.पो.से.), अमरावती परिक्षेत्राचे मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री.रामनाथ पोकळे (भा.पो.से.) यांच्यासह परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांनी स्वतः सदर समारोहास उपस्थित राहून परिक्षेत्रातील खेळाडू पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मनोबल उंचावले.
वाशिम पोलीस दलातील खेळाडू पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांनी पदक प्राप्त खेळाडू अंमलदारांचे कौतुक करत पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments