वाशिम
समाजामध्ये चाकरबद्ध चौकटीत काम करणारे अनेक सरकारी नोकर पाहायला मिळतात. परंतु ज्या कार्यासाठी सरकारने आपल्याला नोकरीवर नियुक्त केलेले आहे त्या कार्याचा परिघ जास्तीत जास्त वाढवता यावा या भावनेने काम करणारे क्वचितच आढळतात. वाशिम जिल्ह्यातील सुपुत्री कुमारी आम्रपाली पडघान हिने वन विभागामध्ये नोकरी करत असताना असाच काहीसा छंद जोपासला आहे.
बोर अभयारण्य असेल किंवा पेंच व्याघ्र प्रकल्प वनरक्षक म्हणून कार्य करीत असताना आम्रपाली हीने अनेक दुर्मिळ वन्यजीवांच्या नोंदी केल्या आहेत. यामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या फुलपाखरांच्या अनेक प्रजाती असुन हजारो सापांना सुद्धा मानवी वस्तीतून पकडुन वन्यजीव अधीवासामध्ये सुरक्षित रित्या सोडण्यासाखे कार्य सुध्दा उल्लेखनीय आहे. स्वतःच्या जीवावर उदार होऊन कार्य करीत असताना मात्र आम्रपालीला कुठ्ल्याही प्रसिद्धीची गरज वाटली नाही. तीच्या समाजमाध्यमावरील पोस्ट तर अगदी बुद्धवचनांची सांगड घालत पर्यावरण संरक्षणाचा मंत्र देताना दिसतात.
ज्या भागात ती नोकरीला आहे त्या भागामध्ये तिने सर्प अभ्यासक म्हणून सुद्धा नावलौकिक मिळवला आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवांच्या जास्तीत जास्त नोंदी घेऊन त्यांना वाचवण्याच्या दृष्टीने शासनाकडे एक प्रकल्प सादर करण्याची तिची मनीषा आहे.
तिचे अनुभव सांगताना आम्रपाली सांगते
बोर व्याघ्र प्रकल्पात बिटात मजुरांसह गस्त करतेवेळी पोपटांचा गोंगाट एकु येत होता. कोणीतरी शिकारी दिसला असावा असा प्राथमिक अंदाज बांधून आम्ही कुतूहलाने थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पाहतो तर काय एका सागाच्या झाडावर दहा-बारा रोझ रिंग पॅराकीट बसलेली होती व गोंगाट करत होती. पोपटांनी आम्हाला पाहिलं आणि अवतीभवती फेरी मारून सागाच्या झाडाकडे ते जात होते जणूकाही ते आम्हाला म्हणत होते तुम्ही आमच्या सोबत चला आम्ही झाडाच्या थोडं जवळ जाऊन पाहिलं तर काय भला मोठा धामण जातीचा बिनविषारी साप त्या सागाच्या झाडाच्या ढोलीत डोकं घालून बसला होता आणि काही पोपट त्या सापाला टोचण्या मारून आजूबाजूला बसून पुन्हा गोंगाट करत होते मग आमच्या लक्षात आले ते पोपट आम्हाला मदतीचा हात मागत होते. माझ्या आयुष्यातला असा पहिलाच अनुभव. धामण साप ढोलीत असलेली रोझ रिंग पॅराकीट ची पिलं गिळून फस्त करत होता. परंतु आम्ही निसर्ग नियमाने बांधील असल्यामुळे बघ्याची भूमिका घेत होतो. पाहता पाहता धामण सापाने तीन पिल्ले गिळली. मला साप ओळखता येतात व साप पकडता ही येतात. तसे पाहता मी त्या पक्षांची मदत करू शकत होते परंतु निसर्गातील अन्नसाखळीचा तो भाग होता आणि अनसाखळी अबाधित ठेवणे यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य म्हणून ते दृश्य आम्ही फक्त पाहत राहिलो. मेजवानी घेऊन धामण साप झाडाच्या खाली उतरला आणि दूर गेला. हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे. याआधीही पेंच व्याघ्र प्रकल्पात असताना अजगर सापाने वानराच्या पिलाला मारले व गीळण्याच्या प्रयत्नात होता, हे पाहिले होते परंतु वन्यप्राणी माणसाला मदत मागतात असा अनुभव पहिल्यांदाच अनुभवला. आम्ही पोपटांना मदत केली नाही, त्या पिल्लांना वाचवलं नाही म्हणून त्यांना आमच्याबद्दल काही प्रश्न पडले असावेत का असा विचार मनात आला. त्यांना प्रश्न पडले की नाही माहित नाही मानव वन्यजीव सहजीवनासाठी लागणाऱ्या मानव आणि वन्यजीवांमधील संवेदनांचा संदर्भ मात्र हा अनुभव नक्कीच देऊन गेला. अनेक प्रशासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठांची कुश-मस्करी करून शाबासकी मिळवणाऱ्या काही अधिकाऱ्यांचा उदो उदो झाल्याचे पाहायला मिळते परंतु खऱ्या अर्थाने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अशा वनरक्षकांचा सुद्धा सन्मान व्हायला हवा.
तिच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा वाशिम खबर चा एक छोटासा प्रयत्न .
0 Comments