कपट काही एक|नेणे भुलवायाचे लोक||१||
तुमचे करितो कीर्तन| गातो उत्तम ते गुण ||२||
दाऊ नेणे जडीबुटी| चमत्कार उठाउठी||३||
नाही शिष्याशाखा| सांगो अयाचित लोकां||४||
नव्हे मठपति| नाही चाहुरांची वृत्ति||५||
नाही देवार्चन| असे मांडिले दुकान||६||
नाही वेताळ प्रसन्न| काही सांगो खाण खुण||७||
नव्हे पुराणिक| करणे सांगणे अणीक||८||
नेणे वाद घटा पटा| करिता पंडित करंटा||९||
नाही जाळीत भणदी| उदो म्हणोनि आनंदी||१०||
नाही हलवीत माळा| भोवते मिळवुनि गबाळा||११||
अगमीचे कुडे नेणे| स्तंभन मोहन उच्चाटणे||१२||
नव्हे यांच्या ऐसा| तुका निरयवासी पिसा||१३||
लोकांची फसवणूक करणाऱ्या चमत्कारासारख्या नाना प्रकारच्या चुकीच्या आणि घातक समजूती ,प्रथा इत्यादींना संत तुकोबारायांचा कमालीचा विरोध होता .आपली ही भूमिका त्यांनी काही अभंगात अनेक उदाहरणांनी स्पष्ट केली आहे. आपल्या साध्याभोळ्या, गोरगरीब लोकांनी अशा प्रथांसाठी आपला वेळ ,धन आपले श्रम वाया घालवू नयेत, हा संत तुकोबारायांच्या या अभंगातून मिळणारा संदेश आपल्याला सदैव मार्गदर्शन करणारा आहे.
संत तुकोबाराय म्हणतात ,मी लोकांना भुलवण्याचं कोणतंही कपट जाणत नाही. मी तुमचं कीर्तन करतो आणि उत्तम गुण गातो. मी जडीबुटी दाखवणं जाणत नाही .मी आकस्मिक म्हणजेच निसर्गातील कार्यकार्यकारण संबंधांच्या विरोधात जाणारे चमत्कार दाखवणं जाणत नाही. माझी शिष्यशाखा नाही. मी बोलावलेले नसताना कोणी लोक आले, तर त्यांना काही सांगतो, इतकंच .मी मठपती नाही .मी उदरनिर्वासाठी कुणाकडे चाहूरभर जमीन मागत नाही. मी देवपूजा करण्याचं दुकान मांडलेलं नाही. लोकांना काही खानाखुणा सांगण्यासाठी मला वेताळ प्रसन्न नाही. मी करायचे वेगळं आणि सांगायचं वेगळं असं करणारा पुराणिक नाही. करंट्या पंडितासारखा घटा-पटाचा वाद करणं मी जाणत नाही. मी 'उदो' म्हणून आनंदानं धूप जाळत नाही. मी गबाळ्या म्हणजेच भोळ्या लोकांना भोवती जमवून माळा हलवीत नाही. मी धर्मशास्त्रातील कोड्यासारख्या गुढ गोष्टी जाणत नाही. मी व्यक्तीला जागच्या जागी थांबवणं, तिला मोहिनी घालणं, तिचं उच्चाटन करणं, अशा वेदातील म्हणजेच या संदर्भात अथर्ववेदातील विद्या जाणत नाही. तुकाराम नरकात वास्तव्य करणाऱ्या म्हणजे दुर्गतीला जाणाऱ्या या लोकांसारखा वेडा नाही.
काही लोक आपल्याकडे विशिष्ट प्रकारच्या शक्ती आहेत, इतरांकडं नसलेलं ज्ञान आहे, असं भासवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. संत तुकोबाराय अशा लोकांवर टीका करतात, याचा अर्थ सर्व सामान्य लोकांनी अशा ढोंगी लोकांपासून सावध राहावं, असंच सांगू इच्छितात.
शिक्षण प्रसाराने ईश्वर कल्पनेत विलक्षण बदल होत गेले .रंजल्या गांजल्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा, हीच खरी निसर्ग सेवा या भावनेतून अनाथ, अपंग ,अशक्त ,निराधार, रोगी, दरिद्री ,अज्ञानी अशा माणसाच्या सेवेतच आपलं आयुष्य समर्पित करावं. समाज मनात झालेला वैचारिक बदल, झालेलं योग्य परिवर्तन हे स्तुत्य असतं. प्रामाणिक माणूस हा ईश्वराची, निसर्गाची सर्वोत्तम कृती आहे, हा प्रामाणिक माणूस सज्जन, परोपकारी ,नीतीमान असेल, म्हणजेच ,तो भक्त नसला तरीही चालेल .
संत तुकोबारायांनी चारशे वर्षांपूर्वी सज्जन व्यक्तींनाच पूजनीय वंदनीय मानलेलं आहे. संत तुकोबाराय म्हणतात ,करिता देवतार्चन, घरी आले संतजन, देव सारावे परते संत पुजावे आरते ईश्वर पूजा करताना, जर घरी सज्जन माणूस आला ,तर आपण देव बाजूला सारावेत आणि सज्जन माणसाचा स्वागत सोहळा, आदर सत्कार मनःपूर्वक करावा. ईश्वर पूजन , हे त्यांच्या दृष्टीने दुय्यम दर्जाचे आहे .समाजात वावरणारे सज्जन लोक हेच महत्त्वाचे, या विचारात जे पुरोगामित्व लपलेला आहे. ते अद्यापही दुर्लक्षितच आहे .म्हणून लोक तीर्थक्षेत्रे याचे खटाटोप करून त्रस्त होतात. देवाची पूजा करणाऱ्या ईश्वर वाद्यांना बुद्धीप्रामाण्य वादी , संत कबीरदासांनी चांगलेच सुनावले. ते म्हणतात
पाहन पूजै हरी मिले ,तो मै पुजू पहाड |ताते तो चक्की भली पिसा खाय संसार||
संत कबीरांनी देवपूजेसह देवही नाकारला. भक्तांना त्यांनी वेड्यात काढले. भक्त दगडाचा लहान देव पूजत असतील तर संत कबीर डोंगराचीच पूजा करायला सिद्ध झाले .आणि दगडाच्या मूर्तीपेक्षा धान्याचे पीठ करणारे जाते चांगले,,कारण ती जगाला भाकरी देते .असा उपहासही त्यांनी उघडपणे ,निर्भयपणे मांडला.
संत तुकोबाराय मानवतेला धर्माचा गाभा मानतात .भूतदया, सर्वांविषयी आदर आणि प्रेमाची भावना ,कनवाळूपणा ही उत्तम मानवाची लक्षणे आहेत. संत तुकोबारायांना अभिप्रेत असलेला धर्म ,हा श्रीहरी प्राप्ती करून देणारा आहे .ज्या धर्माच्या पालनाने श्रीहरी प्राप्त होईल, तोच धर्म .श्रीहरी प्राप्ती ही श्रीहरी कृपेशिवाय शक्य नाही, म्हणून पांडुरंगांनाच ते धर्म मानतात.
ज्या उपायांनी समाजाचं कल्याण होईल ,तेच अंगीकारावे, आचरावे, हाचि माझा नेमधर्म| मुखी विठोबाचे नाम
येवतीकर 8605504866
( शिवव्याख्याते, किर्तनकार, प्रवचनकार, योगशिक्षक ) गाथा प्रचारक,सदस्य गाथा परिवार ,साभार अभंगशतक
जय जगद्गुरू
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
0 Comments