विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
एक गावें आम्हीं विठोबाचे नाम
आणिकापें काम नाहीं आता
मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तर
केला राज्यभार चाले ऐसा|| धॄ||
लावूनि मृदुंग श्रुतीटाळघोष
सेवूं ब्रम्हरस आवडीनें
तुका म्हणे महापातकी पतित
ऐसियांचे हित हेडा मात्रें
जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात ,आम्ही फक्त विठोबाचेच नाव घेत आहोत.विठ्ठलाचं नामस्मरण करणार आहोत आणि आमचा परमेश्वर हा पंढरपूरचा पांडुरंगच आहे, त्यामुळे इथं दुसऱ्या कुणाचं, काहीच काम नाही.आम्ही विठ्ठल सोडून इतर देवाला भजणार नाही.
पूर्वापार चालत आलेल्या अध्यात्माच्या, धार्मिकतेच्या जुन्या रुढी, नको त्या परंपरा, जटील व कठीण वाटा आम्ही मोडीत काढल्या आहेत . वारकरी धर्माचे, भागवत सांप्रदायाचे वारकरी सहज, सुलभ मार्गाने सन्मानाने चालू शकतील असा सरळ, साधा, सोपा भक्तीमार्ग, निर्माण केलेला आहे
मृदुंग लावून ,टाळ, मृदंग ,विणेच्या घोषात ,आम्ही परमेश्वराचं नामस्मरण आवडीने ग्रहण करू, कितऀना दारे समाजाचं प्रबोधन करू . पांडुरंगा परमात्याचे नामस्मरण करत करत, वारकरी धर्माची पताका अखंड फडकवत ठेवू.
वारकरी धर्मामध्ये संताच्या संगतीने सज्जन तर देवस्वरूप बनतातच, परंतु सज्जनासोबतच जी लोक पापी, महापातकी आहेत, ज्यांना दुर्जन समजलं गेलं ,अशा दुर्जनांचही, संताच्या सहवासाने व विठ्ठल भक्तीने,पापाचं क्षालन होऊन त्याचं निमिषाधाऀत हित होतं , पांडुरंगाची भक्ती करून, माझ्या विठोबाचे नामस्मरण करून त्यांच्या जीवनाचं सार्थक होत.
नवशे वषाऀपुवीऀ,तेराव्या शतकाकात संत शिरोमणी नामदेवरायांनी विठ्ठल हे दैवत स्वीकारलं, समाजात प्रस्थापित केलं.संत नामदेवरायांनीच भागवत धर्माच, वारकरी संप्रदायाचं पुनरुज्जीवन केलं.
आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं संत नामदेव महाराज म्हणतात.आणि ते का म्हणतात? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे .
निसर्ग नियमाप्रमाणे माणूस जुनं टाकून नव स्वीकारतो, तसेच अनावश्यक व कालबाह्य बाबी सोडून देवून, जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी स्वीकारतो,जे जुनं झालं असतं, ते टाकावु झालेला असतं, मलीनं झालेला असतं ,जीर्ण झालेल्या असतं त्यामध्ये काहीच उपयोगाचे राहिलेले नसतं, त्यामुळे जुना टाकून नवीन धारण केल्या जातं.
मनुष्यप्राणी जुन्या जीर्ण वस्त्राचा त्याग करून, इतर नवी वस्त्रे धारण करतो .त्याचप्रमाणे जीवात्मा जुनं जीर्ण झालेल शरीर सोडून देतो.आत्मा मानायचा की नाही ? पुनर्जन्मावर विश्वास ठेवायचा की नाही ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.जे जुनं ,जीर्ण ,बिनकामाचं होत असतं, ते टाकावा लागत असतं ,नवीन स्विकारावं लागत असतं.
संत शिरोमणी संत नामदेवरायांनी प्रचलित वैदिक धर्म नाकारून ,भागवत धर्म स्वीकारला विठ्ठल देव म्हणून स्वीकारला . का स्वीकारला ? तर, उघड आहे की, जुना धर्म निरूपयोगी झालेला ,तो धर्म माणसांमध्ये भेद करणारि , बहुसंख्य समाजाचे सर्व मानवी अधिकार हिरावून घेणारा ,बहुजनाच्या विकासातला मुख्य अडथळा होणारा .नव्या पिढीला, मानव जातीला ,समृद्ध जीवन जगण्यासाठी, मार्गदर्शन करण्याची क्षमता निमाऀण करु न शकणारा .
या सर्व गोष्टीची साक्ष देत , संत तुकोबाराय सांगतिहेत, की तुका म्हणे काही, वेदावीर्य शक्ती नाही
ज्या धर्मात सामान्य माणसाला कोणताही अधिकार नाही .जो धर्म माणसाला माणूस म्हणून मानायला तयार नाही .ज्या धर्मात आम्हाला पशु- पेक्षाही वाईट वागणूक मिळते, त्या धर्मात आम्हाला, आमच्या देवाला भेटण्याचाही अधिकार नाही. असा धर्म आमच्यासाठी निरुपयोगी आहे .
संत नामदेव महाराजांना देवळातून धक्के मारून बाहेर काढण्याची कथा आपल्या सगळ्यांना माहित आहे. संत नामदेव महाराज मंदिरात कीर्तन करायला गेले असता, पुजाऱ्याने त्यांना देऊळ बाटवलं म्हणून , देवळातून धक्के मारून बाहेर काढलं ! असं खुद नामदेवरायांनीच लिहून ठेवलेला आहे.
हीन दीन जात मोरी पंढरीचे राया | ऐसा तुने नामा दर्जी कायकू बनाया ||
ताल बिना लेके नामा देऊल मे गया | पूजा करते ब्रम्हण उन्हे बाहर ढॅंकाया ||
देवल के पीछे नाम अल्लख पुकारे | जिधर जिधर नामा उदर देऊल ही फिरे ||
नाना वर्ण गवा उन का एक वर्ण दूध | तुम कहा के ब्रह्मण हम कहा के सुद ||
संत चोखोबांनी मंदिर बाटवलं ,असं म्हणून त्यांना बैलाच्या पायांना बांधून फार फरफटवण्यात आलं, आजच्या 21 व्या शतकातही एकनाथाचे वारस म्हणून घेणाऱ्या मंडळींनी, काशीहून कावड वाहून आणणाऱ्या मराठ्यांना, गाभाऱ्यात प्रवेश दिला नाही.ही ताजी घटना आहे.
देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्यांना लढायला लावायचं आणि मलिदा मात्र प्रस्थापितांनी खायचा.संत नामदेव महाराज स्वाभिमानी होते .आणि स्वाभिमानी माणूस कधी अपमान सहन करत नाही.संत नामदेवराव विचार करू लागले ,जो धर्म आम्हाला शूद्र मानतो, ज्या धर्मात आम्हाला कसलेच अधिकार नाहीत ? जो धर्म आमच माणुसपण नाकारतो, आमचा पदोपदी अपमान करतो , आम्हाला जनावरापेक्षाही हीण वागणूक देतो, हे ब्राह्मण कुत्री मांजरी अंगा खांद्यावर खेळवतात, आणि आमच्या स्पर्शाचा मात्र विटाळ मानतात ,हा आमचा धर्म असू शकत नाही ? मग आमचा धर्म कोणता ? कोणत्या धर्मात आम्हाला सन्मानाची वागणूक मिळेल ? नामदेव महाराजांनी याबाबतीत चिंतन केलं ,शोध सुरू केला आणि त्यांना सापडला .....! भागवत धर्म .....
जुना ,जुलमी , जीर्ण, शीणऀ झालेला टाकाऊ सनातन धर्म ,संत नामदेवरायांनी टाकून दिला आणि नवा धर्म स्वीकारला भागवत धर्म
धर्म आला की देव आलाच! मग आपला देव कोणता ? देवाची आपल्याकडे काही कमी नव्हती ,पण त्यातला कोणता देव स्वीकारायचा ?एकच स्वीकारायचा की, सर्वच स्वीकाराचे ? एकच स्वीकारायचा असेल, तर कोणता स्वीकार करायचा ? सगळे शिकवायचे असतील, तर ते कशासाठी स्वीकारायचे ? एकच स्वीकारायचा तर तोच का स्वीकारायचा ? बाकीचे का नाही स्विकरायचे ?
जिवंत मनाची माणसं विचार करतात मुर्दार विचार करत नाहीत .
गौतम नावाची ऋषी होते.त्यांची पत्नी अहिल्या ,खूप सुंदर होती .इंद्राने तिला पाहिलं आणि पार खुळावला ,कोणतीही सुंदर स्त्री त्याला भोगायला पाहिजे होती.दुसरा बाजीराव हा बहुतेक इंद्राचाच वारस असावा.मग एके दिवशी त्यांने संधी साधली, गौतम ऋषी बाहेर गेल्याचे पाहून त्याने गौतम ऋषी चे रूप घेतलं, त्यांच्या घरी गेला, जे करायचं होतं ते करून गुपचूप निघून गेला .गौतम ऋषी घरी आले, त्यांना कळलं ,त्यांनी पत्नीला शाप दिला, तू शिळा होऊन पडशील .आणि अहिल्याची शिळा झाली* .
" अशा कितीतरी ग्रंथातील गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत.असे आमचे देव, म्हणूनच अशा देवांना नकारात भगवान श्रीकृष्णाने सर्व देवीदेवतांची पूजा नाकारून, बंद करुन,निसर्गाची म्हणजेच गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली .
जो चिकित्सा करतो त्यालाच सत्य आणि असत्य ,सार आणि असार ,योग्य आणि अयोग्य ,चांगला आणि वाईट ,नैतिक आणि अनैतिक, श्रेयस आणि प्रेयस ,शाश्वत आणि अशाश्वत , कालबाह्य आणि कालौचित, क्षणभंगुर आणि कालातीत यातला फरक समजू शकतो .यातला भेद कळू शकतो .स्वीकाराहऀ काय आणि अस्विकाराहऀ काय हे समजू शकतो .
आम्हाला विठ्ठला व्यतिरिक्त कोणत्याही देवाची गरज नाही.असं सांगताना संत नामदेवराय म्हणतात ....
आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड
माझी विठ्ठल माऊली प्रेमपान्हा पान्हायेली
संत तुकोबाराय म्हणतात बळीया माझा पंढरीनाथ जो या देवांचाही देव
तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती
विठ्ठल रोहिदासांना चामड्या रंगवू लागतो .कबीरांना शिले विनू लागतो .दासीपुत्र असलेल्या विदुराच्या घरी कन्या भक्षण करतो .संत सज्जन कसाई यांना तो मास विकू लागतो.सावता महाराजांना खुरपू लागतो .नरहरी महाराजांना घडू, फुंकू लागतो, तर संत चोखा महाराजांना तो मेलेली गुरं ओढू लागतो .जनाबाईसह तो शेण्या वेचतो .अर्जुनाचा सारथी होतो.मिराबाई साठी तो विषयाचा प्याला तोंडाला लावतो.गोरोबांना माती मळू व मडकी घडवू लागतो ,असा हा भक्तवत्सल विठ्ठल सोडून आम्हाला इतर कोणतेही देव नकोत .
विठ्ठल सर्वांशी समान व्यवहार करणारा आहे, तो सर्वांना जवळ घेतो हे खरं असलं, तरी जो जास्त दुबळा असेल त्याला हृदयाचे जास्त जवळ धरतो.आई लहान बाळाला छातीशी धरते आणि नेत्या मुलाला पाठीशी धरून चालवते.लहान बाळाला स्वतः घास भरवते ,मोठाला त्याच्या हाताने खायला लावते , तशी विठाई माऊली आहे , म्हणूनच संत जनाईने विठ्ठलाच्या या वत्सल रूपाचं खूप सुंदर वर्णन केलेल आहे .
शिवश्री विजय गुरुजी
येवतीकर 8605504866
( शिवव्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार )
गाथा प्रचारक.
तथा गाथा अभ्यासक
( सदस्य गाथा परिवार, साभार गाथा परिवार )
जय जगद्गुरू
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
0 Comments