वाशिम (दि. २९ एप्रिल) – शहरातील हिंगोली नाका परिसरातील महात्मा बसवेश्वर चौकावर दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला असून, चौकाची ओळखच मिटवली जात आहे. या गंभीर परिस्थितीविरुद्ध महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून अतिक्रमण हटवण्याची आणि चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या चौकाचे नामकरण नगर परिषदेकडून यापूर्वीच अधिकृतरीत्या महात्मा बसवेश्वर चौक असे करण्यात आले होते. समाजबांधवांनी तेथे चौकफलकही लावला होता, परंतु काही दिवसांतच तो नाहीसा झाला आणि आज फलक असलेल्या ठिकाणीही अतिक्रमण झाले आहे. हा प्रकार अत्यंत खेदजनक असून, समाजाच्या भावना दुखावणारा आहे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
महात्मा बसवेश्वर हे १२व्या शतकातील थोर समाजसुधारक असून, त्यांनी समता, न्याय, बंधुता यांचे मोलाचे विचार दिले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरणही झाले आहे. अशा थोर महात्म्याच्या नावाने असलेल्या चौकाची झालेली उपेक्षा हा समाजाचा अपमान आहे.
नगर परिषद व प्रशासनाने तत्काळ अतिक्रमण हटवून चौकाचे सौंदर्यीकरण करावे. अन्यथा लिंगायत विरशैव समाजबांधव तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा समितीने निवेदनात दिला आहे.
या वेळी शिष्टमंडळात समितीच्या अध्यक्षा डॉ. सौ. अर्चना मेहकरकर, कार्यकारी अध्यक्ष पवन इसापुरे, उपाध्यक्ष सचिन फुटाणे, सचिव स्वप्नील जिरवणकर यांच्यासह गोपाल जिरवणकर, बाळासाहेब मेहकरकर, चंद्रकांत खेलुरकर, नंदकिशोर देशमुख, सुरेश घळे, किशोर पेंढारकर, दत्ता चवरे, संजय काष्टे, विजय महाजन, अशोक वणगे, सागर रावले, सौ. रेखा रावले आदी उपस्थित होते.
0 Comments