कारंजा, 23 मे: कारंजा तालुक्यातील पारवा कोहर येथील धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आज दुपारी शोधून बाहेर काढण्यात आला. ही अत्यंत कठीण आणि धाडसी मोहिम पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, शाखा मंगरूळपीर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
आज सकाळी युवक बुडाल्याची माहिती मिळताच पथकप्रमुख दिपक सदाफळे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मंगरूळपीर शाखेचे जवान अतुल उमाळे, गोपाल गीरे, गोपाल जयस्वाल, शिवा अडात व सागर डाहाके यांनी घटनास्थळी दाखल होत शोधकार्य सुरू केले. दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
मृत युवकाची ओळख दिनेश बंडु सावळे (वय 27, रा. नेताजी नगर, जि. यवतमाळ) अशी पटली आहे. मृतदेह पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला.
शोध मोहिमेदरम्यान कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे, पो.उ.नि. खंडारे, पिएसआय स्वप्नील चव्हाण, पो.कॉ. संजय घाटोळे, अजय माकोडे, महसूलचे निलेश गुगळे, तलाठी रूपाली धोटे, पो.पा. दिलीप थाटे व नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहीरू भगत यांच्याशीही सतत संपर्क राखण्यात आला होता.
पथकप्रमुख दिपक सदाफळे यांनी या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली असून, जवानांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments