"शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देताना — अर्जुन भीमराव सुर्वे"
शेलुबाजार वार्ता : शेलुबाजारसह संपूर्ण मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी आज वणवण फिरत आहेत. कारण त्यांच्या बँक खात्यावर 'होल्ड'चा आळ बसलेला आहे! केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या पीक विमा, पीएम किसान, दुष्काळी अनुदानासारख्या रकमा त्यांच्या खात्यात जमा होतात, मात्र त्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत — कारण बँक व्यवस्थापक त्यावर होल्ड ठेवत आहेत!
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक आणि इतर बँकांनी अनधिकृतपणे शेतकऱ्यांच्या खात्यांवरील अनुदान थांबवले आहे. कारण काय? तर पीक कर्ज थकीत आहे! निसर्गाच्या लहरीपणा, अतिवृष्टी, आणि हमीभाव नसल्याने कर्ज फेडता न आलेल्या शेतकऱ्यांना आता हक्काचे अनुदान मिळवण्यासाठी पुन्हा बँकेपुढे हात जोडावे लागत आहेत.
"कर्ज भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत" — असा संदेश बँक व्यवस्थापकांकडून मिळत असून शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत होत चालला आहे. खात्यावर जमा झालेले अनुदान असूनही पैसे न मिळाल्याने शेतकरी कुटुंबांसमोर उपासमारीची वेळ आली आहे.
या अन्यायकारक परिस्थितीविरोधात सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भीमराव सुर्वे यांनी आवाज उठवला आहे. "शेतकऱ्यांचे बचत खाते आहे, ते कर्ज खातं नाही. अनुदान हा शेतकऱ्याचा हक्क आहे, बँकेचा नाही!" — असा रोष त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी संबंधित बँकांना निवेदन दिले असून "बचत खात्यावरील होल्ड त्वरित काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल," असा इशारा दिला आहे.
प्रशासनाला जागे करण्यासाठी ही बातमी धक्का बसावा अशीच आहे. आता बँक व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या व्यथेकडे डोळसपणे पाहण्याची वेळ आली आहे. अन्यथा पेटलेला शेतकरी रस्त्यावर उतरेल, आणि मग त्याचा परिणाम थेट शासनावर जाणवेल, हे विसरता कामा नये.
0 Comments