मंगरूळपीर : (सुधाकर चौधरी)
मंगरूळपीर
स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मा. आ. अ. राठोड, प्राचार्य डॉ. एस. एम. वडगुले तसेच मानद व्यवस्थापकीय अधिकारी डॉ. एल. के. करंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात रासेयोचे आराध्य दैवत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. रेड रिबन क्लबच्या वतीने जागतिक एचआयव्ही/एड्स दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रद्धा गंजे (बी.कॉम.–भाग २) हिने केले.
ग्रामीण रुग्णालयातील एचआयव्ही/एड्स समुपदेशक डॉ. आर. व्ही. आडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत एचआयव्ही/एड्सबाबतचे गैरसमज दूर केले. प्रतिबंध, उपचार आणि जागरूकतेचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी जागरूकता रॅली काढून “सेफ लाईफ – सेफ फ्युचर” चा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य स्पर्धा आणि निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एस. एम. वडगुले यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ. एस. ए. राठोड आणि सहाय्यक प्राध्यापक आकाश वाघमारे उपस्थित होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी. आर. तायडे यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
या वेळी उपस्थित सर्वांना एचआयव्ही/एड्स प्रतिबंधाची शपथ देण्यात आली. प्राचार्य डॉ. वडगुले आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. तायडे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाचे कौतुक करून सामाजिक आरोग्यविषयक विषयांवर जनजागृती घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमात स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण उपक्रमाचे संयोजन NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी. आर. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
0 Comments