धानोरा खुर्द येथील श्री धानोरकर आदर्श विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य मा. श्री. एम. एन. धानोरकर सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. ए. एम. धानोरकर मॅडम व विज्ञान शिक्षक श्री. जी. व्ही. पाटील सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली. यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनावर अभ्यासपूर्ण मनोगत सादर केले. तसेच इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी गीतांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा प्रभावी आढावा मांडला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एम. एन. धानोरकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोठा संघर्ष केला आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणले, असे त्यांनी ठासून सांगितले.
प्रमुख अतिथी सौ. ए. एम. धानोरकर मॅडम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या कार्यामुळेच आज स्त्रियांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन इयत्ता आठवी ‘अ’ ची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा रवींद्र भगत हिने केले, तर इयत्ता सातवीची कुमारी धनश्री बाळासाहेब निमंग्रे हिने आभार प्रदर्शन केले.
0 Comments